यवतमाळ जिल्ह्यातील वणीचा सौरभ ‘कोलकाता नाईट रायडर्स’ संघासोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 10:17 PM2020-09-24T22:17:54+5:302020-09-24T22:18:27+5:30
डोक्यात क्रिकेटच वेड घेऊन थेट मुंबई गाठणाऱ्या वणीच्या एका युवकाची कोलकाता नाईट रायडर्स या संघाच्या सहाय्यक गोलंदाज प्रशिक्षक पदावर नियुक्ती झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : डोक्यात क्रिकेटच वेड घेऊन थेट मुंबई गाठणाऱ्या वणीच्या एका युवकाची कोलकाता नाईट रायडर्स या संघाच्या सहाय्यक गोलंदाज प्रशिक्षक पदावर नियुक्ती झाली आहे.
सौरभ कुमार आंबटकर असे या युवकाचे नाव आहे. वणी-मारेगाव मार्गावर असलेल्या मांगरूळ येथे जन्म घेणाºया सौरभचे कुटुंब नंतर वणीत स्थायिक झाले. पदवी घेतल्यावर त्याने क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी मुंबई गाठली. तेथे शारदाश्रमात प्रवेश घेऊन आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरविले.
हे करित असताना तो विदर्भ रणजी सामनेदेखिल खेळला. तत्पूर्वी १४ वर्षाआतील महाराष्ट्राच्या चमुतही त्याने सहभाग नोंदवून उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. गेल्या काही वर्षापासून मुंबईत तो क्रिकेट प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. दुबईत इंडियन प्रिमीयम लिगचे सामने रंगत आहे. हे सामने सुरू होण्यापूर्वी त्याला कोलकाता नाईट रायडर्स या संघाच्या सहाय्यक गोलंदाज प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळण्याची आॅफर त्याला आली. सौरभने लगेच होकार भरला. सध्या तो दुबई येथे कोलकाता नाईट रायडर्स संघाला गोलंदाजीचे प्रशिक्षण देत आहे. यासाठी मोठे बंधू स्वप्नील आंबटकर यांचे प्रोत्साहन मिळाले, असे सौरभने सांगितले.
वडिलांच्या अंत्यदर्शनाला येऊ शकला नाही
सौरभचे वडील कुमार आंबटकर हे व्यवसायाने डॉक्टर होते. १४ सप्टेंबरला त्यांचे आजाराने निधन झाले. त्यावेळी सौरभ दुबईत होता. त्यामुळे त्याला वडिलांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही. पित्याच्या मृत्यूचे दु:ख उरात दडवून तो प्रशिक्षक पदाची जबाबदारी पार पाडत आहे