पांढरकवडात पहिल्याच दिवशी शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 05:00 AM2020-07-26T05:00:00+5:302020-07-26T05:00:12+5:30
२३ व २४ जुलैै या दोन दिवसांत पांढरकवडा शहरात तब्बल ३४ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची झोप उडाली. या पार्श्वभूमीवर पांढरकवडा शहरात सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरातच राहून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : शहरात कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढताच, जिल्हा प्रशासनाने २५ ते ३१ जुलैैपर्यंत येथे संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार शनिवारी पहिल्या दिवशी पांढरकवडा शहरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. नागरिकही घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे दिवसभर रस्त्यावर स्मशानशांतता दिसून आली.
२३ व २४ जुलैै या दोन दिवसांत पांढरकवडा शहरात तब्बल ३४ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची झोप उडाली. या पार्श्वभूमीवर पांढरकवडा शहरात सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरातच राहून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मागील पंधरा दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैैकी तब्बल ३४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. त्यातच एका व्यक्तीचाही कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे पांढरकवडा शहराची चिंता वाढली आहे. केवळ दोन दिवसांत शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कारोनाची साखळी मोठी आहे. ती तोडल्या गेली नाही, तर पांढरकवडा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागालादेखील त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पांढरकवडा शहरावर कोरोनाचे सावट होते. सुरूवातीचा लॉकडाऊन आणि जनतेने घेतलेली खबरदारी यामुळे शहरात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. परंतु ९ जुलै रोजी मधप्रदेशातून एक व्यक्ती पांढरकवडा येथे त्याच्या घरी परत आली. त्यानंतर त्याचा कोरोना रिपोर्ट पोसिटीव्ह आला. तेथूनच कोरोनाची साखळी तयार झाली.
पोलिसांचा खडा पहारा
पांढरकवडा शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन घोषित केला. अत्यावश्यक सेवेत मोडणारी औषध विक्रीची दुकाने, दवाखाने व दूध विक्री वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशा सूचना नागरिकांना केल्या आहेत. त्यानुसार, पांढरकवडा पोलिसांनी शहरातील महत्वाच्या चौकात खडा पहारा देऊन परिस्थितीवर लक्ष ठेवले. अकारण घराबाहेर पडणाऱ्यांना घरातच थांबण्याचे आवाहन यावेळी पोलीस करीत होते.
मस्जिद वॉर्ड कोरोनाचा हॉटस्पॉट
पांढरकवडा शहरातील मस्जीद वॉर्डातील एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले, तेव्हा मृत व्यक्तीच्या संपर्कातील सर्वाधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे मस्जिद वॉर्ड कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे या परिसरात कोरोनाची प्रचंड दहशत आहे. प्रशासनाकडून नागरिकांची तपासणी केली जात आहे.