दिग्रस येथील एसटी बसस्थानक परिसर बनला समस्यांचे माहेरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:05 AM2019-08-28T00:05:07+5:302019-08-28T00:05:29+5:30
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दिग्रस येथे बसस्थानक व आगाराची निर्मिती केली. परंतु सध्या हे बसस्थानक समस्यांनी ग्रासलेले आहेत. या परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यात पावसाचे पाणी साचून गटार झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेले येथील बसस्थानक माहेरघर बनले आहे. बसस्थानकाच्या परिसरात आणि प्रवेशद्वारातही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यात आता पाण्याचे डबके साचल्याने प्रवाशांंसह बसचालक व वाहकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत आहे.
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दिग्रस येथे बसस्थानक व आगाराची निर्मिती केली. परंतु सध्या हे बसस्थानक समस्यांनी ग्रासलेले आहेत. या परिसरात ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यात पावसाचे पाणी साचून गटार झाले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. दिग्रस आगारात भंगार बस, जीर्ण बस असून सदर बसनेच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. नियमित वेळेवर बस न सोडण्याचा पराक्रम येथील प्रशासन गाजवित आहे. त्याचा फटका मात्र ग्रामीण प्रवाशांना बसत आहे. बसस्थानक परिसरात अनेक सोई-सुविधांचा अभाव असून याकडे अधिकारी, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहे.
गेल्या काही वर्षांपासून येथे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डांबरीकरण उखडल्याने खड्ड्यात पाण्याचे डबके साचले. येथील विद्युत खांबावर लाईट आहे पण ते सतत बंद असतात.
त्यामुळे रात्रीच्या वेळी बसस्थानकात अंधाराचाच मुक्काम असतो. अंधारात बसूनच काही प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर अतिशय गंभीर बनला आहे. अधिकारीही याकडे लक्ष देत नसल्याने समस्या जैसे थे आहे. बसस्थानकात सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे.