यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वेळोवेळी वाढ झाली. परंतु, वाढलेल्या भत्त्याच्या फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना मागील तीन वर्षांपासून देण्यात आली नाही. ८५ हजारांवर कर्मचाऱ्यांना याची प्रतीक्षा आहे. शिवाय सेवानिवृत्तांना रजा, युतीकाळात झालेल्या वेतनवाढीतील शिल्लक रक्कम मिळालेली नाही. महामंडळाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तर दुसरीकडे सरकारचाही निधी देण्यात आखडता हात आहे.
महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो. शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता ३८ टक्के, तर एसटी कर्मचाऱ्यांना २८ टक्के मिळतो. मागील तीन वर्षांत महामंडळ कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात झालेल्या वाढीच्या फरकाची रक्कम थकीत आहे. ही रक्कम मिळावी यासाठी कर्मचारी आणि संघटनांकडून पाठपुरावा करण्यात आला. सध्यातरी यादृष्टीने कुठल्याही हालचाली दिसत नाहीत.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळातील रजेची रक्कम देण्यात आलेली नाही. राज्यातील युती सरकारच्या काळात झालेल्या वेतनवाढीतील ४८ आठवड्याची शिल्लक रक्कमही त्यांना मिळालेली नाही. यासाठी सुमारे २१५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा देण्यासाठी महामंडळाकडे निधी नाही. त्यामुळे थकीत रकमेचे आकडे फुगत गेले.
कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची देणी चुकती करण्यासाठी महामंडळाने शासनाकडे ७३८.५० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यातील केवळ ३४५ कोटी रुपये देण्यात आले. आता अलीकडे त्यात दिवाळीमध्ये ४५ कोटी रुपयांची भर घालण्यात आली. वास्तविक महामंडळाला यापेक्षा अधिक रक्कम कर्मचाऱ्यांना चुकती करायची आहे. पैसा देण्यात सरकार हात आखडता घेत असल्याचे दिसून येते.
अर्थसंकल्पात २४५० कोटींची तरतूद
शासनाने एसटी महामंडळासाठी २०२२-२३च्या अर्थसंकल्पात १४५० कोटी व पुरवणी मागणीद्वारे १००० कोटी, अशी एकूण २४५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील आतापर्यंत महामंडळाला १२६१.५० कोटी रुपये मिळाले. त्यात दिवाळीतील ४५ कोटी रुपयांची भर पडली. सरकारकडे आणखी रक्कम शिल्लक आहे. ही रक्कम देऊन कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न निकाली काढावे, अशी अपेक्षा आहे.
पूर्वी फाइल मंजुरीसाठी खूप वेळ लागायचा. या सरकारच्या काळात मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, महामंडळाचे अध्यक्ष स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. हा एक चांगला योगायोग आहे. याचा महामंडळ, कर्मचाऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस.