‘एसटी’च्या स्मार्ट कार्डने ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाला मर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 11:32 AM2019-06-25T11:32:12+5:302019-06-25T11:33:32+5:30
वर्षभरात कितीही प्रवास केला तरी अर्धीच तिकीट लागेल, या अलिखित सवलतीला ज्येष्ठ नागरिकांना आता मुकावे लागणार आहे. स्मार्ट कार्ड मिळताच प्रवासाचा हिशेब सुरू होणार आहे.
विलास गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वर्षभरात कितीही प्रवास केला तरी अर्धीच तिकीट लागेल, या अलिखित सवलतीला ज्येष्ठ नागरिकांना आता मुकावे लागणार आहे. स्मार्ट कार्ड मिळताच प्रवासाचा हिशेब सुरू होणार आहे. चार हजार किलोमीटर संपताच पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. याची सुरुवात काही ठिकाणी झाली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिटात वर्षभरात चार हजार किलोमीटरच प्रवास करता येतो. मात्र याची मोजदाद होत नव्हती. आधार कार्ड, मतदान कार्ड या आधारे अर्धे तिकीट दिले जात होते. या मर्यादेपासून सवलत घेणारेही अनभिज्ञ होते. आता एसटी महामंडळ सवलत घेणाऱ्यांना स्मार्ट कार्ड देत आहे. १ एप्रिल ते ३१ मार्च या एक वर्षाच्या कालावधीसाठी स्मार्ट कार्डची मुदत राहणार आहे. मुदत संपताच प्रत्येक वर्षी नुतनीकरण करावे लागणार आहे.
ज्येष्ठ नागरिकाचे स्मार्ट कार्ड मशिनद्वारे स्वाईप केले जाणार आहे. याद्वारे कार्डधारकाने नेमका किती प्रवास केला याची माहिती वाहकाला मिळणार आहे. (उदा. प्रवास सवलत ४००० किलोमीटर. नागपूर-अमरावती प्रवास १५० किलोमीटर. चार हजारमधून १५० वजा. उरले ३९५० किलोमीटर). असाच हिशेब प्रत्येक प्रवासात होणार आहे. चार हजार कि़मी. संपले रे संपले की वाहक पूर्ण तिकीट फाडणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाला आता आपण किती प्रवास केला, याची मोजदाद करावी लागणार आहे.
स्मार्ट कार्डची आगारनिहाय नोंदणी केली जात आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नाही त्यांच्याकडील आधारकार्ड पाहून त्यांना अर्ध्या तिकिटाद्वारे प्रवास करू दिला जाणार आहे. पुढील काळात मात्र अर्ध्या तिकिटासाठी ‘आधार’ तुटणार आहे. स्मार्ट कार्ड योजना लागू झाल्याने प्रवासादरम्यान होणारी बोगसगिरी आणि महामंडळाचे होणार आर्थिक नुकसान थांबणार आहे.
स्मार्ट कार्डचे फायदे अधिक
ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड दिले जाणार असल्याने आधार कार्ड, मतदान कार्डातून सुटका होणार आहे. स्मार्ट कार्ड रिचार्जची सोय आहे. त्यामुळे प्रवासात सोबत पैसे बाळगण्याची गरज नाही. स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी ज्येष्ठांना ५५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. आॅनलाईन नोंदणीनंतर कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाते. त्यानंतर दहा ते १५ दिवसात संबंधितांना कार्ड दिले जाते.