वणी आगाराच्या बसवर पुन्हा दगडफेक; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 06:26 PM2021-12-08T18:26:29+5:302021-12-08T18:26:56+5:30
बुधवारी वणी आगारातून पाटणसाठी बस सोडण्यात आली. परतीच्या प्रवासात मानकीलगत एका अज्ञात इसमाने बसवर दगडफेक केली. या घटनेत बसचे १० हजारांचे नुकसान झाले.
यवतमाळ : पाटणवरून वणीकडे परत येत असलेल्या बसवर मानकीलगत अज्ञात इसमाने दगडफेक केली. यात बसच्या समोरच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले.
ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. यापूर्वी यवतमाळवरून वणीकडे येणाऱ्या बसवर करंजी येथे दगडफेक करण्यात आली होती. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या एक महिन्यापासून बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र यादरम्यान काही वाहक-चालक कामावर रुजू झालेत. त्यामुळे वणी आगारातून काही बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. बुधवारी वणी आगारातून पाटणसाठी बस सोडण्यात आली. परतीच्या प्रवासात मानकीलगत एका अज्ञात इसमाने बसवर दगडफेक केली. या घटनेत बसचे १० हजारांचे नुकसान झाले. यासंदर्भात वणी आगाराचे प्रमुख सुमेध टिपले यांना विचारणा केली असता, दगडफेक करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.