अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रेम दोन व्यक्तींना जवळ आणते. त्यातून भांडणतंटे मिटतात, वैर संपते. मात्र, प्रेमाचे गैरअर्थ काढून अनेकजण प्रेमाच्याच नावाखाली गुन्हे करू लागले आहेत. त्यामुळे प्रेमप्रकरणातून वाढलेल्या वादावादीने गेले वर्षभर पोलिसांना इतर गंभीर गुन्ह्यांचा तपास बाजूला ठेवून अशा अजब-गजब प्रेमविरांच्या मागे पळत राहावे लागले. कुठे एकतर्फी प्रेमातून छेडछाड तर कुठे विवाहबाह्य प्रेमप्रकरणातून थेट खुनापर्यंत वाद पोहोचले. सोमवारी जगभरात ‘प्रेम दिवस’ साजरा होत असताना जिल्ह्यात प्रेमाच्या नावाखाली घडलेल्या गुन्ह्यांचा हा संक्षिप्त तपशिल...
शेजारच्या म्हातारीचा फोन वापरून तरुणीला काॅल
तरुणांना हाती मोबाईल येताच आवडत्या तरुणीपर्यंत पोहोचणे सोपे वाटू लागले आहे. त्यातूनच घाटंजी येथील एका महाविद्यालयीन युवतीला चक्क तेलंगणातील तरुणाने एकतर्फी प्रेमातून ऑनलाईन प्रस्ताव पाठविला. गंमत म्हणजे, शेजारी राहणाऱ्या म्हातारीचा मोबाईल त्यासाठी वापरला. जवळपास पाच-सहा महिने त्या तरुणाची ऑनलाईन छेडखानी सहन केल्यानंतर घाटंजी पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. थेट आदिलाबादमध्ये पोहोचून त्या उनाड तरुणाला ताब्यात घेण्यात आले.
प्रेमाच्या नावाने शिक्षकाने वर्गातच खाल्ला मारयवतमाळ तालुक्यातील एका शाळेत वयस्क शिक्षकाने विद्यार्थिनीला प्रेमाच्या नावाने नादी लावले. प्रेम कसले? शोषण केले. याची कुणकूण गावकऱ्यांना लागताच त्यांनी भरवर्गातच या जोडप्याला नको त्या अवस्थेत पकडले. शिक्षकाला बदडून काढले. विद्यार्थिनी ज्याला प्रेम समजत होती तो शिक्षकासाठी केवळ एक खेळ होता. त्याचा अंत वाईट झाला. गुरुजी सध्या निलंबित आहे.
कमी वयात प्रेम जडले, प्रशासनाचे दंडुके पडलेगावखेड्यात नकळत्या वयात अनेकजण प्रेमात पडून नको त्या गोष्टी करून बसतात. अशा एका प्रेमवीर जोडप्याचे घरच्या मंडळींनी लग्न ठरवले. मात्र, बालविवाह प्रतिबंध कायदा आडवा आला आणि तहसील प्रशासनाने भर मांडवात पोहोचून लग्न वऱ्हाड्यांचीच धुलाई केली. आधी नेर तालुक्यात ठरलेला हा विवाह लपून-छपून घाटंजी तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. तोही उधळला गेला.
वाशिममध्ये घर, पुण्यात प्रेम अन् दिग्रसमध्ये खून
वाशिम जिल्ह्यात लग्न होऊन आलेल्या तरुणीला पुण्यात नोकरी मिळाली. घराबाहेर राहताना विवाहापूर्वीचे प्रेमप्रकरण उफाळून आले. त्यातूनच नवरा-बायकोची फारकतही झाली. मात्र, प्रेम आणि विवाहबाह्य प्रेमाचा संघर्ष उडाला. या विवाहितेला नियोजनपूर्वक दिग्रसमध्ये बोलावून तिचा निर्घृण खून करण्यात आला. तब्बल आठ दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह पोलिसांना सापडला. तर १५ दिवस तपास केल्यानंतर मारेकरी नवरा अडकला.
पैशासाठी मुलाने मुलगी बनून केले प्रेमाचे नाटकप्रेमाचा बनाव करून एका तरुणाने चक्क आपण सुंदर तरुणी असल्याचे साेंग घेतले. यवतमाळातील या तरुणाने दिल्लीतील श्रीमंत डाॅक्टरला मुलीच्या आवाजात फोन करून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. स्वत:वरचे प्रेम सिद्ध करण्यासाठी या नकली ‘तरुणी’ने डाॅक्टरकडून चक्क दोन कोटी रुपये उकळले. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला, त्यावेळी आरोपी तरुणी नसून, धडधाकट तरुण असल्याचे कळताच सर्वांची बोबडी वळली. प्रेमासारख्या चांगल्या गोष्टीचा वाईट पद्धतीने वापर केल्यास माणूस गुन्हेगार ठरून जेलमध्ये पोहोचू शकतो, हेच या घटनेतून पुढे आले.