वणी उपविभागात मुसळधार पावसाने हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 09:58 PM2018-07-09T21:58:46+5:302018-07-09T21:59:34+5:30

गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे वणी, झरी, मारेगाव व पांढरकवडा तालुक्यात हाहाकार उडाला आहे. पावसामुळे नदी-नाले फुगले असून निर्गुडा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने सोमवारी नागरिकांचे चांगलेच हाल झालेत.

There was heavy rain in the Wani subdivision | वणी उपविभागात मुसळधार पावसाने हाहाकार

वणी उपविभागात मुसळधार पावसाने हाहाकार

Next
ठळक मुद्देनदी, नाले झाले ओव्हरफ्लो : अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद, निर्गुडेने ओलांडली धोक्याची पातळी

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे वणी, झरी, मारेगाव व पांढरकवडा तालुक्यात हाहाकार उडाला आहे. पावसामुळे नदी-नाले फुगले असून निर्गुडा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने सोमवारी नागरिकांचे चांगलेच हाल झालेत.
नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या २४ तासांत वणी तालुक्यात ४१.५० मि.मी.पावसाची नोंद झाली. पांढरकवडा तालुक्यात १३.८३ मि.मी., मारेगाव तालुक्यात ५६.८ मि.मी., तर झरी तालुक्यात २३.६ मि.मी.पावसाची नोंद झाली.
वणी शहरालगतच्या नदीकाठावर वसलेल्या गणेशपूर पुलावरून दोन फुटापेक्षा अधिक पाणी असल्याने हा मार्ग ठप्प झाला आहे. या गावलगतच्या अष्टविनायक सोसायटीपर्यंत निर्गुडा नदीच्या पुराचे पाणी पोहचले आहे. येथे अतिक्रमण करून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना तेथून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील अनेक गावालगतची शेती पाण्याखाली आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. घोन्सा मार्गावरील ड्रीमलॅन्ड सिटीलगत असलेला नाला व मोहर्ली येथील नाला दुथडी भरून वाहत असल्याने सोमवारी सकाळपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प होती. नांदेपेरा परिसरातील बावनमोेडी, वाघाड्या, व गुंजच्या नाल्याला पूर आल्याने शेलू खुर्द, रांगणा, भुरकी, नांदेपेरा आदी गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. सोमवारी सायंकाळीदेखील पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नदी-नाल्यांच्या प्रवाहात वाढ झाली होती. झरी तालुक्यात संततधार पाऊस सुरू असल्याने धानोरा, हिरापूर नवीन, हिरापूर जुने, राजूर, दुर्भासह अनेक गावांना लागून असलेल्या नाल्यांना पूर आल्याने या गावांचा संपर्कदेखील तुटला आहे. शेकडो एकर शेती पाण्याखाली आली असून पैैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाने उसंत घेतली नाही, तर नदी काठावरील धानोरा, हिरापूर, दुर्भा, विठोलीसह नदीकाठची गावे पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी पूरग्रस्त परिसरात दौैरा करून परिस्थितीची पाहणी केली. मारेगाव तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
चार मार्गावरील बससेवा बंद
गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे वणी आगाराला अनेक बसफेऱ्या सोमवारी रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झालेत. घोन्सा मार्गावरील ड्रीमलॅन्ड व मोहर्ली येथील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरून धावणाºया बसेस सोडण्यात आल्या नाहीत. मुकुटबन मार्गावरील पेटूर नाल्याला पूर आल्याने या मार्गावरदेखील सोमवारी बसेस धावल्या नाहीत. राळेगाव मार्गावर नांदेपेरा, वनोजा, मच्छिंद्रा येथील नाल्याला पूर असल्याने या मार्गावरील सर्वच वाहतूक ठप्प होती. शिरपूर मार्गावरील वारगावजवळ पुलावरून पाणी असल्याने कोरपना येथे जाणाऱ्या बसेस सोडण्यात आल्या नाहीत. परिणामी अनेक प्रवासी बसस्थानकावर खोळंबून होते. हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झालेत.
वणीतील शाळांना सुटी
गेल्या २४ तासांत वणी परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. ही बाब लक्षात घेऊन सोमवारी अनेक खासगी शाळांनी सुटी दिली, तर काही शाळांनी दुपार पाळीनंतर शाळा बंद ठेवल्या. रस्ते बंद असल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या.
सखल भागात पाणी
वणी शहरातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झालेत. गणेशपूर भागातील नदीकाठावर असलेल्या अनेक दुकानांमध्ये तसेच घरातदेखील पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील मोमिनपुरा परिसरातील विवेकानंद शाळेच्या आवारात पाणी शिरले.

Web Title: There was heavy rain in the Wani subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.