रेल्वेस्थानकावरील तिजोरी फोडून साडेतीन लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:44 PM2019-02-20T23:44:42+5:302019-02-20T23:45:52+5:30
येथील रेल्वेस्थानकावर चोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. चोरट्याने तिकीट काऊंटरवर लावलेला काच फोडून रेल्वेची तिजोरी फोडली. दोन दिवस सुटी आल्याने येथे कोणीच फिरकले नाही. याच संधीचा लाभ चोरट्यांनी घेतला. तीन लाख ६१ हजारांची रोकड लंपास केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील रेल्वेस्थानकावरचोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. चोरट्याने तिकीट काऊंटरवर लावलेला काच फोडून रेल्वेची तिजोरी फोडली. दोन दिवस सुटी आल्याने येथे कोणीच फिरकले नाही. याच संधीचा लाभ चोरट्यांनी घेतला. तीन लाख ६१ हजारांची रोकड लंपास केली.
या घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. या रेल्वे स्थानकावरून यवतमाळ-मूर्तीजापूर ही शकुंतला नॅरोगेज रेल्वे धावत होती. मात्र २७ जुलै २०१७ पासून ही ट्रेन बंद झाली होती. त्यामुळे या स्थानकावरून केवळ तिकीट आरक्षण काढण्यात येते.
१८ आणि १९ फेब्रुवारी झालेल्या आरक्षणाची रक्कम तीन लाख ६१ हजार ३२५ रुपये रेल्वे स्थानकावरील तिजोरीमध्ये ठेवून होती. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी रेल्वे स्थानकाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये असलेल्या काच फोडून त्यांनी तिजोरीतील रक्कम लंपास केली.
या घटनेची माहिती मूर्तीजापूर रेल्वे तसेच भुसावळ रेल्वे स्थानकाला देण्यात आली. भुसावळ रेल्वे स्थानकाचे सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार, मूर्र्तीजापूरचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर बडनेरा रेल्वे पोलीस पथकानेही घटनास्थळाला भेट दिली. रेल्वे स्थानकावर रात्रीच्या सुमारास अनेक गैरप्रकार चालतात. हा गुन्हेगारांचा अड्डाच बनला आहे. यापैकी कोणीतरी येथे हात साफ केला असवा, असा संशय व्यक्त होत आहे. तूर्तास या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अवधूतवाडी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धावडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्रकरण रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीतील असल्याने घटनास्थळाचा पंचनामा करून रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला. आता पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहे.