नीलेश यमसनवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथून १० किलोमिटर अंतरावर असलेले आणि टिपेश्वर अभयारण्याच्या सीमेवर वसलेले सुन्ना गाव...दुपारी ३.४५ वाजताची वेळ...अचानक एक वाघीण आणि तिचे चार बछडे गावालगतच्या शेतात एका शिरतात...शेतात चरत असलेल्या बैलावर वाघीण झडप घालते... हा थरारक प्रसंग पाहून तेथे काम करीत असलेल्या महिलांची भंबेरी उडते. गावकरी वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यात यश येत नाही. अंगावर शहारे आणणारा हा थरार बुधवारी सुन्ना गाववासीयांनी अनुभवला. एकाने हा हल्ला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला.सुन्ना येथील प्रवीण बोळकुंटवार या शेतकऱ्याचे सुन्ना येथे टिपेश्वर अभयारण्याच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ शेत आहे. बुधवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास शेताच्या धुऱ्यावरून एक वाघीण येत असल्याचे शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांना दिसली. या वाघिणीने धुऱ्यावर चरत असलेल्या बैलावर हल्ला चढविला. अकस्मात घडलेल्या या घटने महिला मजूर धास्तावले. त्यापैकी एका महिला मजुराने शेतमालकाला फोन करून वाघ शेतात शिरल्याचे सांगितले. शेतमालक प्रवीण बोळकुंटवार यांच्यासह गावातील शाहरूख खान, विजय एंबडवार, गजानन जिड्डेवार, महेश बोळकुंटवार, सोहन बोळकुंटवार, मारोती जिड्डेवार, अमित चिंतकुटलावार हे तातडीने शेतात पोहोचले. त्यावेळी वाघीण बैलाच्या अंगावर बसून असल्याचे त्यांनी बघितले. या सर्वांनी वाघाला हुसकावून लावण्याच्या उद्देशाने जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र धुऱ्याच्या दुसऱ्या बाजूने त्या वाघिणीचे चार बछडे उभे असल्याचे त्यांना दिसल्याने सर्वच घाबरून गेले. या सर्वांनी लगेच तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, वाघिणीच्या हल्ल्यात बैल ठार झाला. वाघांची संख्या अधिक असल्याने आम्ही बैलाला वाचवू न शकल्याची खंत प्रवीण बोळकुंटवार यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.दुसऱ्याही दिवशी वाघिणीचे दर्शनशिकार केल्यानंतर साधारणत: दुसऱ्या दिवशी वाघ शिकार खाण्यासाठी येतो. बुधवारी बैलाची शिकार केल्यानंतर गुरूवारी पहाटे ५ वाजता हल्लेखोर वाघीण पुन्हा शेतात शिरली. ती सकाळी ७ वाजेपर्यंत शेतातच ठाण मांडून होती. तिच्यासोबत तिचे चार बछडेही होते, अशी माहिती शेतमालक प्रवीण बोळकुंटवार यांनी ‘लोकमत’ला दिली.
यवतमाळ जिल्ह्यात वाघिणीचा हल्ला कॅमेऱ्यात कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:01 PM
.शेतात चरत असलेल्या बैलावर वाघीण झडप घालते...हा थरार बुधवारी सुन्ना गाववासीयांनी अनुभवला. एकाने हा हल्ला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला.
ठळक मुद्देसुन्ना गावालगत थरारएकाचवेळी पाच वाघ शिरले शेतात, हल्ल्यात बैल ठार