उमरखेड ठाणेदाराचेच घर फोडले

By Admin | Published: January 22, 2015 02:12 AM2015-01-22T02:12:22+5:302015-01-22T02:12:22+5:30

नागरिकांच्या मालमत्तेचा सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र आता पोलिसांवर स्वत:च्याच मालमत्तेची आधी सुरक्षा सांभाळण्याचा बाकाप्रसंग ओढवला आहे.

Umarkhed broke into the house of Thanedar | उमरखेड ठाणेदाराचेच घर फोडले

उमरखेड ठाणेदाराचेच घर फोडले

googlenewsNext

उमरखेड : नागरिकांच्या मालमत्तेचा सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र आता पोलिसांवर स्वत:च्याच मालमत्तेची आधी सुरक्षा सांभाळण्याचा बाकाप्रसंग ओढवला आहे. कारण चोरट्यांनी चक्क उमरखेड ठाणेदाराच्या घरालाच निशाणा बनविले आहे. चोरट्यांनी येथील माजी आमदाराच्या जावयाचे घर फोडून अडीच लाख रुपयांचा ऐवजही लंपास केला.
उमरखेडमध्ये ठाणेदाराच्या घरी झालेल्या चोरीच्या प्रयत्नाच्या घटनेने पोलीस दलाच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरेच वेशीवर टांगली गेली आहे. स्वत:च्या घराची सुरक्षा न सांभाळू शकणारे ठाणेदार खरोखरच जनतेच्या सुरक्षेसाठी सक्षम आहेत का हा जिल्हा पोलीस प्रशासनासाठी चिंतनाचा विषय ठरला आहे.
उमरखेड शहरातील नाथनगरात माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचे जावई डॉ. शरद माने राहतात. त्यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. यावेळी माने कुटुंबीय आपल्या बोरी या गावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा दोन लाख ३८ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. याच घराला लागून उमरखेडचे ठाणेदार शिवाजी बचाटे राहतात. तेही बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या घराला कुलूप होते. हीच संधी साधून चोरट्यांनी बचाटे यांच्याही घराचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळविला. पैसे आणि दागिन्यांच्या शोधात घरातील संपूर्ण सामान अस्तव्यस्त केले. मात्र घरातून नेमके काय चोरीला गेले, हे स्पष्ट होऊ शकले नाही. ठाणेदार बचाटे सुटीवरून परत आल्यानंतरच चोरीतील ऐवजाची किंमत स्पष्ट होईल. ठाणेदाराकडे झालेल्या चोरीच्या प्रयत्नाची कोणतीही नोंद उमरखेड पोलिसांच्या दप्तरी घेतली गेली नाही. ठाणेदार बाहेरगावी असल्याने चोरी झाली की नाही याची माहिती मिळू शकली नसल्याचे उमरखेड ठाण्यातून सांगण्यात आले. डॉ. माने यांच्याकडील झालेल्या चोरी प्रकरणी भादंवि ४५७, ३८० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरखेड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांकडून होणारा त्रास लक्षात घेता अनेक घटना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतच नाही. या चोऱ्यांबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकांची ओरड आहे. पोलीस चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरले, चोरीच्या घडलेल्या घटना उघडकीस आणण्यातही पोलिसांना यश आले नाही. पोलीस नियमित रात्रगस्त करीत नाही, अशी ओरड आहे. आता खुद्द ठाणेदाराचेच घर फोडल्याने नागरिकांच्या पोलिसांप्रती असलेल्या विविध तक्रारींवर शिक्कामोर्तब झाले आहे. ठाणेदाराच्याच घराला निशाणा बनविले गेल्याने सामान्य नागरिकांमध्ये आपल्या संपत्तीविषयी असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. ठाणेदाराच्या घरी धडक देऊन चोरट्यांनी उमरखेड पोलिसांपुढे खुले आव्हान उभे केले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Umarkhed broke into the house of Thanedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.