वेतनाच्या प्रतीक्षेत उमरखेडच्या अंशकालीन निदेशकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:48 AM2017-07-20T00:48:41+5:302017-07-20T00:48:41+5:30
पाच वर्षांपासून जीवाचे रान करीत शिकविणाऱ्या तालुक्यातील चुरमुरा येथील अंशकालिन निदेशकाचा वेतनाच्या प्रतीक्षेत मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : पाच वर्षांपासून जीवाचे रान करीत शिकविणाऱ्या तालुक्यातील चुरमुरा येथील अंशकालिन निदेशकाचा वेतनाच्या प्रतीक्षेत मृत्यू झाला. न्यायालयाने निर्णय देवूनही शिक्षण विभागाने कोणतीच कारवाई न केल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली होती.
जयवंत रामा जाधव (३२) असे मृत अंशकालिन निदेशकाचे नाव आहे. ते चुरमुरा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यानुभव निदेशक म्हणून २०१२ पासून कार्यरत होते. आतापर्यंत त्यांना एक रुपयाही वेतन मिळाले नाही. परंतु जयवंत शाळेवर जावून विद्यार्थ्यांना शिकवित होते. परंतु संसाराचा गाडा कसा चालवायचा, पत्नी, छोटी मुलगी, आई-वडिलांना कसे जगवायचे, अशी विवंचना त्याला सतावत होती. शासनाने ठरविलेली पटसंख्येची अट, जिल्हा परिषदेने मंजूर केलेले मानधन वेळेवर न मिळणे अशा मानसिक विवंचनेतून तो आजारी पडला. मात्र दवाखान्यात जाण्यासाठीही त्याच्याजवळ पैसे नव्हते. काय करावे, या विवंचनेत बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.