एक लाख तेंदू मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 03:08 PM2019-05-15T15:08:09+5:302019-05-15T15:10:26+5:30
सलग तीन वर्षे तेंदूपत्त्याचे बंपर उत्पादन झाले. त्या तुलनेत उठाव मात्र घटला. परिणामी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातून तेंदूची मागणी घटली. भरीस भर म्हणून २८ टक्के जीएसटी करही आकारला गेला आहे. परिणामी या उद्योगातून व्यापाऱ्यांनी पाय काढण्यास सुरूवात केली आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सलग तीन वर्षे तेंदूपत्त्याचे बंपर उत्पादन झाले. त्या तुलनेत उठाव मात्र घटला. परिणामी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातून तेंदूची मागणी घटली. भरीस भर म्हणून २८ टक्के जीएसटी करही आकारला गेला आहे. परिणामी या उद्योगातून व्यापाऱ्यांनी पाय काढण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे राज्यातील एक लाख बिडी कामगार आणि तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे.
राज्यभरात तेंदू संकलनाचे ३०० युनिट आहेत. यापैकी २०४ युनिटची विक्री झाली. ९६ युनिट खरेदी करण्यासाठी व्यापारी आलेच नाही. यासाठी वनविभागाने ९ ते १० वेळा रिटेंडर प्रोसेस पूर्ण केल्या. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. नॉन पेसा आणि पेसा क्षेत्रातील या युनिटमध्ये तेंदूची झाडे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र या तेंदूपानाला खरेदी करणारे व्यापारी यावर्षी राज्यात आले नाही. यामुळे तेंदू एजंटही हैराण झाले आहेत.
यवतमाळ, जळगाव, बिड, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, बुलडाणा, अकोला, पुसद, पांढरकवडा, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील हे ९६ युनिट आहेत. लिलाव पार पडलेल्या २०४ युनिटमधून पान खरेदीकरिता लागलेली बोली अत्यल्प आहे. यामुळे या युनिटपासून यावर्षी ३८ कोटी रूपयेच मिळण्याचा अंदाज आहे.
२०१५-१६ आणि २०१७ मध्ये राज्यात तेंदूचे बंपर उत्पन्न झाले. त्याला चांगले दर मिळाले होते. आता या पानावर कारखानदारांना २८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. सोबतच बिडीचे नवीन ग्राहकही कमी झाले आहे. बिडी बंडलच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे खरेदी करणारे ग्राहकही घटले आहे. याचा परिणाम तेंदूच्या व्यवसायावर झाला आहे. यातून तेंदूचे ९६ युनिट विकल्याच गेले नाही.
या जंगलामधून शासकीय अहवालानुसार ३२ कोटी २४ लाख ३८ हजार पुड्यांचे उत्पादन होते. त्याकरिता तीन लाख मजुरांना रोजगार मिळतो. यासोबत बिडी कारखान्यातील रोजगाराची संख्या मोठी आहे. उठाव नसल्याने खरेदी घटली आहे. यासोबत बिडी कारखान्यात निर्मितीचे कामही कमी करण्यात आले आहे. ९६ युनिटमधील एक लाख मजुरांना कामच मिळाले नाही.
एक मजूर, एक हजार पुड्यांची बांधणी
साधारणत: एक मजूर एक हजार ते १२०० पुड्यांची बांधणी करतो. संपूर्ण हंगामात तीन लाख २२ हजार ४३८ मानक बोऱ्यांची बांधणी होते. त्यामध्ये ३२ कोटी पुडे असतात. उन्हाळ्यातील दोन महिने हा हंगाम चालतो. यावर्षी त्याचा फटका स्थानिक मजुराला बसला आहे.
जीएसटीमुळे व्यापाऱ्यांनी तेंदूपत्ता खरेदी कमी केली आहे. व्यापाऱ्यांकडे स्टॉक आहे. या उत्पादनाची बाजारातील मागणी कमी झाली. यामुळे तेंदू उत्पादनाला मोठा फटका बसला.
- अब्दुल गिलानी, तेंदूपत्ता एजंट विदर्भ प्रांत