अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासह त्यांच्या प्रयोगशीलतेला चालना देण्यासाठी केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या ‘इन्स्पायर अवार्ड’ योजनेला यंदा महाराष्ट्रातून अत्यल्प प्रतिसाद आहे. नियमानुसार राज्यातून दोन लाख ८२ हजार प्रयोग अपेक्षित असताना केवळ सात हजार विद्यार्थ्यांनी नामांकने दाखल केली आहेत.
विशेष म्हणजे, दरवर्षी या योजनेत देशातून सर्वाधिक नामांकने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडून भरली जातात. यंदा मात्र कोरोनाचे संकट, त्यामुळे बंद असलेल्या शाळा, कमी झालेला शिक्षक-विद्यार्थी संपर्क याचा विपरित परिणाम होऊन नामांकनांमध्ये प्रचंड घट झाली आहे. शिवाय, दरवर्षी शाळेमार्फत नामांकने भरली जातात. यंदा कोविडमुळे विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन नामांकने मागविण्यात आली आहे.भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने राबविली जाणारी ही योजना महाराष्ट्रात राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या मार्फत राबविली जाते. सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नामांकने भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र २५ सप्टेंबर उजाडूनही अपेक्षित नामांकने आलेली नाहीत.५६ हजार शाळांवर फोकससहावी ते बारावीपर्यंत वर्ग असलेल्या ५६ हजार ४४० शाळांकडून प्रत्येकी पाच नामांकने मागविण्यात आली आहेत. त्यानुसार राज्यातून दोन लाख ८२ हजार २०० विद्यार्थ्यांचे प्रयोग येणे आवश्यक आहेत. परंतु, आतापर्यंत केवळ सहा हजार ५१९ नामांकने आली आहेत. यात जिल्हानिहाय अपेक्षित नामांकने अशी आहेत : अमरावती ८१६५, अकोला ५४४५, नागपूर ११७१५, यवतमाळ ९०४०, वर्धा ३५३५, भंडारा ३३४०, चंद्रपूर ६५७५, गोंदिया ४७४५, वाशिम ७५८, बुलडाणा ६७६५, गडचिरोली ४३१०, अहमदनगर ९८८५, औरंगाबाद १२८९०, बीड ७९१५, धुळे ३७१०, हिंगोली ३४८५, जळगाव ८१६०, जालना ६००५, कोल्हापूर ११३३५, लातूर ८२४५, नांदेड ९३७०, नंदूरबार ३४३०, नाशिक १२६४५, उस्मानाबाद५३३०, पालघर ८४३०, परभणी ६५४५, पुणे १९१९०, रायगड ७६८५, रत्नागिरी ७५८०, सांगली ७४४०, सातारा ८९५०, सिंधुदुर्ग ३८९०, सोलापूर १११०५, ठाणे १७११०, मुंबई १४३६५.यवतमाळात नामांकन नाही, तर पगार नाही!यवतमाळ जिल्ह्यातील १८०८ शाळांमधून ९ हजार ४० नामांकने अपेक्षित असताना केवळ ३५ नामांकने आली आहेत. त्यामुळे शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी प्रत्येक शाळेला पत्र पाठवून नामांकने दाखल न केल्यास सप्टेंबरची पगार देयकेच स्वीकारली जाणार नाही, अशी तंबी दिली आहे. दरम्यान, शिक्षक संघटनांशी चर्चा झाली असून आता नामांकने वाढतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.