उमरखेडच्या भाजपा आमदारांना गावकऱ्यांनी सुनावले खडेबोल

By admin | Published: March 12, 2017 12:59 AM2017-03-12T00:59:07+5:302017-03-12T00:59:07+5:30

तालुक्यातील समस्यांचा विशेषत: पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी नगरपालिका सभागृहात शुक्रवारी आमसभा पार पडली.

The villagers of Umarkhed told the MLAs that Khadebol | उमरखेडच्या भाजपा आमदारांना गावकऱ्यांनी सुनावले खडेबोल

उमरखेडच्या भाजपा आमदारांना गावकऱ्यांनी सुनावले खडेबोल

Next

पाणीटंचाई आढावा बैठक गाजली : नदीत पाणी सोडण्यास विलंब
उमरखेड : तालुक्यातील समस्यांचा विशेषत: पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी नगरपालिका सभागृहात शुक्रवारी आमसभा पार पडली. आमदार राजेंद्र नजरधने अध्यक्षस्थानी होते. योग्यवेळी धरणाचे पाणी नदीपात्रात सोडले जात नाही, असा मुद्दा उपस्थित करीत नदीकाठच्या गावकऱ्यांनी आमदारांना चांगलेच धारेवर धरले.
आमसभेला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार भगवान कांबळे, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य राम देवसरकर, सभापती प्रयागताई कोत्तेवार, उपसभापती विठ्ठल चव्हाण, भाजपाचे सतीश वानखेडे, संदीप हिंगमिरे, बाळासाहेब चंद्रे, बळवंतराव नाईक, भीमराव चंद्रवंशी, सहायक पोलीस निरीक्षक उन्हाळे, सर्व विभागांचे अधिकारी, सर्व तलाठी आणि ग्रामसेवक उपस्थित होते.
आमसभेत सर्वप्रथम तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांचा आढावा घेण्यात आला. कृती आराखड्यात फक्त १६ विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव दर्शविण्यात आले. परंतु आमसभेत पाणीटंचाईवर चर्चा सुरू असताना बहुसंख्य ग्रामपंचायतींना आगामी एप्रिल-जूनच्या कालावधीत पाणीटंचाईला सामारे जावे लागणार असल्याची बाब पुढे आली. ग्रामीण भागासाठी २० दशलक्ष घनमीटर पाणी पैनगंगा पात्रात सोडण्यासाठी आरक्षित केल्याचे आमदार नजरधने यांनी सांगितले. त्यावर चातारी येथील नागरिकांनी आमदारांना चांगलेच धारेवर धरले. गरजेच्यावेळी नदीपात्रात कधीच पाणी सोडले जात नाही, असा आक्रोश नागरिकांनी केला.
मागील वर्षी या मागणीसाठी मोर्चे, आंदोलने करावी लागली, असे आमदारांच्या निदर्शनास नागरिकांनी आणून दिले. सद्यस्थितीत टँकर पुरवठ्याची तरतूद दाखविण्यात आली असली तरी डोंगरगाव, बोथा, पोफाळी, वसंतनगर, बिटरगाव, ढाणकी, टेंभुरदरा, मेट, विडूळ, चातारी, आकोली, ब्राह्मणगाव, बाळदी, कृष्णापूर आणि नदीकाठच्या २५ ते ३० गावांना वेळेपूर्वी नदीपात्रात धरणाचे पाणी सोडले गेले नाही तर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा बहुतांश सरपंचांनी आमसभेत दिला.
कित्येक गावांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. परंतु दरवर्षी विहीर अधिग्रहणाचे, नळ दुरुस्तीचे तुणतुणे वाजविले जाते. त्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु दरवर्षी पाणीटंचाईला तोंड देण्याची परिस्थिती निर्माण होते, अशी खंत नागरिकांनी आमसभेत व्यक्त केली. काही गावांना फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे लागत असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडे ठोस उपाययोजना नाहीत. केवळ कागदी आकड्यांवरच दरवर्षी पाणीटंचाई निवारणाचा खेळ केला जातो, अशीही खंत नागरिकांनी बोलून दाखविली. (प्रतिनिधी)

Web Title: The villagers of Umarkhed told the MLAs that Khadebol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.