यवतमाळात टरबुजाचा झाला स्फोट! फेसही आला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 06:38 PM2020-05-22T18:38:17+5:302020-05-22T18:39:06+5:30
वेळेपूर्वीच टरबूज पिकविण्याच्या नादात त्याला इंजेक्शन दिले जाते. यातून मानवी आरोग्याला तर धोका आहेच; पण शुक्रवारी अशा टरबूजाचा चक्क स्फोट झाला. शहरातील शिंदे प्लॉट परिसरात हा प्रकार घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वेळेपूर्वीच टरबूज पिकविण्याच्या नादात त्याला इंजेक्शन दिले जाते. यातून मानवी आरोग्याला तर धोका आहेच; पण शुक्रवारी अशा टरबूजाचा चक्क स्फोट झाला. शहरातील शिंदे प्लॉट परिसरात हा प्रकार घडला.
येथील श्रीराम भास्करवार यांनी हातगाडीवरून टरबूज विकत घेतले. ते त्यांनी पाण्यात ठेवल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात फेस आला. यामुळे त्यांनी हे टरबूज अंगणात नेऊन ठेवले. यानंतरही फेस मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. मग अचानक त्याचा स्फोट झाला. आवाज इतका मोठा होता की घरातील काही साहित्य पडल्याचा सर्वांना भास झाला. बाहेर जाऊन बघितले तर अंगणात टरबूज फुटले होते. या प्रकाराने सर्वत्र आश्चर्य आणि भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रोथ प्रमोटर्स आणि कार्बाईडचे रिअॅक्शन
शेतकरी फळाच्या वाढीसाठी ग्रोथ प्रमोटरचा वापर करतात. यातून फळाचा आकार वाढतो. क्षमतेपेक्षा अधिक आकार वाढल्याने असा स्फोट होतो. व्यापारीही फळांना पिकविण्यासाठी कार्बाईडसारखी रसायने वापरतात. याचे प्रमाण अधिक झाल्यासही स्फोट होतो. शेतात टरबूजाने अधिक पाणी शोषण केले तरी शेतात असे स्फोट घडतात, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी दिली.