पिंपळगावात कामगारांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:26 PM2019-06-25T22:26:50+5:302019-06-25T22:27:24+5:30
नोंदणी केल्यावर कामाच्या साहित्याची किट न मिळाल्याने मंगळवारी कामगारांचा जमाव भडकला. त्यामुळे पिंपळगाव रस्त्यावर शेकडो कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बायपासवरील जडवाहतूक बराच काळ खोळंबली होती. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचाºयांनी मध्यस्थी करून आंदोलन थांबविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नोंदणी केल्यावर कामाच्या साहित्याची किट न मिळाल्याने मंगळवारी कामगारांचा जमाव भडकला. त्यामुळे पिंपळगाव रस्त्यावर शेकडो कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बायपासवरील जडवाहतूक बराच काळ खोळंबली होती. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचाºयांनी मध्यस्थी करून आंदोलन थांबविले. मात्र किट कामगारांपर्यंत कधी पोहोचणार हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. साहित्य वितरण करण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेचे पदाधिकारीच उपस्थित नसल्याने गोंधळ वाढला. सायंकाळपर्यंत ही गोंधळाची स्थिती कायम होती.
ज्या कामगारांनी आपली नोंद कामगार कार्यालयात केली आहे, त्यांना किट वितरित करण्यात येत आहे. याकरिता कामगार कार्यालयाकडे १६ कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. कामगारांचे हे साहित्य वितरित करण्याची जबाबदारी त्रयस्थ संस्थेला सोपविण्यात आली आहे. या संस्थेला मजुरांची संपूर्ण माहिती आॅनलाईन भरण्याचे काम सोपविण्यात आले आहे. यानंतर पाच हजार रूपयांची किट मजुरांना दिली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. तरी या ठिकाणी एजंटांनी डेरा टाकला आहे. हे एजंट मजुरांना पैसे मागतात. तुम्हाला किट मिळवून देतो, असे आश्वासन देतात. त्याचा ५०० ते २००० रूपये रेट आहे. या माध्यमातून मजुरांची लूट होत आहे.
एजंटांच्या सूचनेनुसार मजूर सर्व कामे सोडून यवतमाळात येत आहे. किट वाटप करण्याची क्षमता १०० ते २०० इतकी असताना या ठिकाणी दररोज दोन ते अडीच हजार मजूर उभे राहत आहे. जिप्सी, ट्रॅक्स, मिनीडोअर, मालवाहू गाड्या भरून मजूर मध्यरात्रीच मुक्कामी येत आहे. पिंंपळगाव रोडवरील बालाजी मंगल कार्यालयालगत त्यांच्या रांगा लागत आहे.
मात्र मंगळवारी या ठिकाणी किट वाटप करणारे कर्मचारीच आले नाही. त्यामुळे संतापलेल्या कामगारांनी रास्तारोको केला. यामुळे जडवाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. स्थिती स्फोटक झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचारी पोहोचल्यावर आंदोलक शांत झाले. मात्र चर्चेनंतरही योग्य तोडगा न निघाल्याने सायंकाळपर्यंत गोंधळाची स्थिती कायम राहिली.
कामगारांनी एजंटांमार्फत काम करू नये. हे सारे काम मोफत आहे. एजंट आढळल्यास त्यांना कामगार कार्यालयाकडे आणावे. त्यांना योग्य धडा शिकविला जाईल.
- राजदीप धुर्वे,
जिल्हा कामगार अधिकारी, यवतमाळ