झुंडशाहीपुढे असेच नमते घेणार का? - अरुणा ढेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 05:44 AM2019-01-12T05:44:53+5:302019-01-12T05:45:42+5:30
उद्घाटन सोहळ्यात संमेलनाध्यक्षांनी सुनावले : साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याची खंत
प्रज्ञा केळकर-सिंग/ स्नेहा मोरे
यवतमाळ : झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचे धनी होण्याच मार्ग स्वीकारणार का? असा सवाल करीत ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करून संयोजकांकडून गंभीर चूक घडली आहे. संमेलन साहित्यबाह्य शक्तीच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट असताना ती जोखीम समाजशक्तीने उचलली पाहिजे, ही काळाची गरज संयोजकांना ओळखता आली नाही, अशा कठोर शब्दांत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी संमेलनाच्या आयोजकांना व्यासपीठावरूनच सुनावले.
डॉ. वि .भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय आणि विदर्भ साहित्य संघाच्या यवतमाळ शाखेच्या वतीने आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील वैशाली येडे यांच्या हस्ते झाले. मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. अरुणा ढेरे यांच्याकडे सुपूर्द केली. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद उद्घाटन समारंभातही उमटले. देशमुख यांनी सहगल यांच्या नियोजित भाषणातील काही उतारे वाचून दाखवत आयोजकांवर निशाणा साधला. तर डॉ. ढेरे यांनीही खडे बोल सुनावले.
संमेलन हा उत्सव असतो पण अनेक कारणांनी आपण त्या आनंदोत्सवाचं स्वरूप गढूळ होऊ दिले. आपले दुर्लक्ष, भाबडेपणा आणि मर्यादित समज, आपल्या लहानसहान मोहांना आणि वाङमयीन राजकारणाला सहज बळी पडणं, या सगळ्या आणि इतर कारणांमुळे आपण हा उत्सव भ्रष्ट होऊ दिला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याने सगळ्या मराठी साहित्यप्रेमींच्याच माना खाली जाताहेत, याची गंभीर जाणीव असायला हवी होती.
संमेलनाचे उद्घाटन करताना शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला वैशाली येडे, डॉ. अरुणा ढेरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्ष पालकमंत्री मदन येरावार. मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महामंडळाच्या प्रभारी अध्यक्ष विद्या देवधर, नगराध्यक्ष कांचन चौधरी आदी.
नाक कापले गेले - विनोद तावडे
नयनतारा प्रकरणाने महाराष्ट्राचे नाक कापले गेले आहे. याचे सरकारलाही दु:ख झाले आहे, असे सांगून तावडे म्हणाले, संमेलनात
जे व्हायला नको, तेच घडले. याबाबतीत अनेक मते मांडली गेली. नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द करणे ही बाब सरकारलाही आवडलेली नाही. संमेलनाला सरकार केवळ अनुदान देते. उद्घाटक कोण असावा, संमेलनात कोणी सहभागी व्हावे, यात सरकार हस्तक्षेप करत नाही, असा खुलासाही त्यांनी केला.