यवतमाळ मेकओव्हर
By admin | Published: January 22, 2015 02:11 AM2015-01-22T02:11:19+5:302015-01-22T02:11:19+5:30
शतकाचा वारसा लाभलेल्या यवतमाळ शहराचा मेकओव्हर सुरू असून दारव्हा मार्गावरील पथदिव्यांमुळे रात्री यवतमाळचे रुप महानगरासारखे दिसत आहे.
यवतमाळ : शतकाचा वारसा लाभलेल्या यवतमाळ शहराचा मेकओव्हर सुरू असून दारव्हा मार्गावरील पथदिव्यांमुळे रात्री यवतमाळचे रुप महानगरासारखे दिसत आहे. एवढेच नव्हे तर खेळासाठी मैदान आणि आरोग्य सुविधांसाठी नवे शल्यचिकीत्सालय उभारले जाणार आहे.
सह्यांद्री पर्वत रांगेच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या यवतमाळला प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे. काही ऐतिहासिक वास्तु नागरिकांचे लक्ष वेधुन घेतात. यामध्ये प्रामुख्याने नगरभवन आणि केदारेश्वर शिवालयाचा समावेश होता. आता या वैभवात आणखी काही नव्या संकल्पना भर घालणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ता दुभाजक आणि यवतमाळ-दारव्हा मार्गाच्या चौपदरीकरण आणि सौंदर्यीकरणाचा समावेश आहे. हा मार्ग औद्योगिक वसाहतीपर्यंत सुसज्ज करण्यात आला आहे. या रस्त्याच्या मधोमध पथदिवे लावण्यात आले आहेत. यामुळे शहरात प्रवेश करताच महानगरात प्रवेश करत असल्याचा भास होतो.
यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पोस्टल मैदानाच्या गॅलरी खालचा खुला भाग घाणीने बरबटला होता. आता या ठिकाणी नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून गॅलरी खालचा भाग दुकानात रूपांतरित करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने आपल्या परिसरात पवनचक्की आणि सौर ऊर्जा बसविले आहेत. यामुळे कार्यालयाचा विजेचा खर्च वाचण्यास मदत झाली आहे.
वाढत्या लोकसंख्येनुसार आरोग्य केंद्राची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य केंद्रांची संख्या वाढविण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार शल्यचिकीत्सक विभागाने पोस्टल मैदानावर समोरील भागात इमारत उभारली आहे.
१०० खाटांचे हे रूग्णालय असणार आहे. यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा परिसर सुशोभित करण्यासोबत जिल्हा कचेरी आणि पोेलीस मैदानाचे सौंदर्यीकरण केले जात आहे. विश्रामगृहाचा संपूर्ण परिसर सुशोभित करण्यावर भर दिला जात आहे. या ठिकाणी बगिच्याचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)