अविनाश खंदारे यवतमाळ - नागपूर बोरी तुळजापुर राष्ट्रीय महामार्ग शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या उमरखेडमध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अरूंद रस्ते मोकाट जनावरे आणि त्यावरून अहोरात्र अवजड वाहतूक यामुळे अपघातांचं प्रमाण वाढले आहे. शहरातील कोणत्याही रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस दिसत नसल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. उमरखेड शहरातील रस्ते अतिशय अरूंद आहे त्यातच अनेक रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. शहरातील मुख्य चौक अरुंद रस्त्यांनी जोडलेले आहेत. परिणामी चौकात येणाऱ्या वाहनांची गर्दी होऊन वाहतूक विस्कळीत होते. शहरात असणाऱ्या काही मुख्य रस्त्यांना दुभाजक लावले आहेत. परंतु या रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडुन बसलेली असतात या जनावरामुळे दिवसागणिक छोटे मोठे अपघात होतात.
शहरातील माहेश्वरी चौक गायत्री चौक बसस्थानक चौक नगर परिषद गार्डन परिसर महागांव रोड नांदेड रोड ढाणकी रोड पुसद रोड आदी ठिकाणी फेरीवाल्यांनी दुकाने थाटलेली आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा असलेली जागा हातगाड्यांवाल्यांनी काबीज केली आहे. संभाजी उद्यान ते माहेश्वरी चौक यांना जोडणाऱ्या बोळवजा अरूंद रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी असताना अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने तिथे उभे केली जातात. तसेच माहेश्वरी चौकाच्या तिहरी वळणावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात. हा सर्व प्रकार पोलिसांना माहीत आहे परंतु पाणी कुठे मुरते हेच समजत नाही अशा स्थितीत वाहतूक पोलीस गप्प का असा प्रश्न आहे.
शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. पेट्रोल पंपापासून विश्राम गृहापर्यंत वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. ऐन संध्याकाळी वाहनांची संख्या वाढते तसेच नागरीक ही रस्त्यावर दिसतात. त्यामुळे संध्याकाळी ७ते रात्री ९ वाजेपर्यत रस्ता पार करने धोक्याचे झाले आहे शहरात पार्किगचा अभाव असल्याने अनेक वाहनेही अस्ताव्यस्त उभी असतात त्याचाही फटका वाहतुकीला बसत आहे.वाहतूक पोलीस नावालाच उमरखेड शहरात माहेश्वरी चौक पुसद रोड महागांव रोड नांदेड रोड ढाणकी रोड आदी ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती असते. परंतु शहरातील विस्कटलेली वाहतूक सुरळीत करण्यात कोणताही हातभार लावला जात नाहीत. शहरात अनेक तरुण सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यांनाही वाहतूक पोलिसांकडून अटकाव केला जात नाही.