यवतमाळ : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांना 120 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आता 20 डिसेंबर रोजी नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्या सभापतींची निवड करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाकडून काढण्यात आला आहे. 23 ऑगस्टला मुदत संपल्यानंतर 120 दिवसांचा कालावधी वाढीव देण्यात आला होता. आता तो अवधी 20 डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया घेण्यात यावी असा आदेश उपसचिव र.आ. नागरगोजे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे.
सर्व जिल्हाधिकारी व सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हा आदेश देण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम लवकरच लागणार आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या वर्तुळात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेत राज्यातील महाआघाडी फॉर्म्युला राबविला जाणार आहे. त्यासाठी नेत्यांकडून चाचपणी सुरु आहे.
सर्वाधिक संख्याबळ असलेली शिवसेना अध्यक्ष पदासाठी दावेदारी करेल तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विषय समित्यांमध्ये महत्वाची पदे मिळविण्यासाठी, उपाध्यक्ष पदासाठी आपल्या स्तरावर दबाव निर्माण करतील अशी स्थिती आहे. त्यामुळे राज्यात राबवण्यात आलेला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यवतमाळच्या जिल्हा परिषेदत यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार.
वचपा काढण्याची संधी
शिवसेनेकडे सर्वाधिक 20 सदस्य आहेत. अडीच वर्षापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी सत्ता स्थापनेचे निश्चित झाले होते. मात्र घोडेबाजारानंतर भाजपने सत्तेत उपाध्यक्षपद, हस्तगत केले. त्यावेळी शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागले. हा वचपा काढण्याची संधी शिवसेना नेत्यांकडे आली आहे. यात केवळ महाविकास आघाडी हे समीकरण जुळविणे बाकी आहे.