नाटकी प्रशासनाला युवा कलावंतांचा अल्टीमेटम

By admin | Published: March 28, 2017 01:23 AM2017-03-28T01:23:18+5:302017-03-28T01:23:18+5:30

भला मोठा रंगमंच. डॉक्टर आणि त्याच्या बायकोचा अभिनय फर्मास. विक्षिप्त पेशंटही कसदार संवाद फेकण्यात रममान... नाटक रंगात आलेलं पण प्रेक्षक म्हणून चिटपाखरूही नाही!

Young Artists' ultimatum to dramatics | नाटकी प्रशासनाला युवा कलावंतांचा अल्टीमेटम

नाटकी प्रशासनाला युवा कलावंतांचा अल्टीमेटम

Next

अभिनव आंदोलन : नाट्यगृहाचा १४ वर्षांचा वनवास संपविण्याची मागणी
यवतमाळ : भला मोठा रंगमंच. डॉक्टर आणि त्याच्या बायकोचा अभिनय फर्मास. विक्षिप्त पेशंटही कसदार संवाद फेकण्यात रममान... नाटक रंगात आलेलं पण प्रेक्षक म्हणून चिटपाखरूही नाही! मग नाटक नेमकं कोण करतंय? आणि कुणापुढे कुणासाठी करतंय..? मुळात हे नाटक नव्हतेच; तो होता खराखुरा निषेध! प्रशासनाच्या नाटकी वर्तनाचा!
सोमवारी दुपारचा हा प्रसंग जरा बुचकळ्यात टाकणारा, पण प्रशासनाला खणखणीत चपराक देणारा होता. गेल्या १४ वर्षांपासून यवतमाळ शहरात नाट्यगृहाचे बांधकाम सुरू आहे. जुन्या नाट्यकर्मींनी संघर्ष करूनही नाट्यगृहाचा १४ वर्षांचा वनवास संपायला तयारच नाही. म्हणून सोमवारी जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य हेरून युवा कलावंतांनी अभिनव निषेध आंदोलन केले. अर्धवट अवस्थेत असलेल्या नाट्यगृहाच्या रंगमंचावर आपली कला सादर केली. ही गांधीगिरी बघण्यासाठीही प्रशासनाचे प्रतिनिधी पोहोचले नाही. पण कलावंतांनी आपल्या मागण्यांचे पत्र मुख्याधिकाऱ्यांना नेऊन दिल्यावरही ते समाधान करू शकले नाही. नाट्यगृहाचे बांधकाम मराठी रंगभूमी दिन ५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत पूर्ण करा, त्यासाठी बांधकाम कंत्राटदार बदलवा किंवा कामाकरिता कामगार वाढवा, नाट्यगृहाला आणि रंगमंचाला स्थानिक ज्येष्ठ कलावंताचे नाव द्या आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. त्यासोबतच नगरपरिषदेच्या शाळांमध्ये युवाकलावंतांची मार्गदर्शन तासिका ठेवावी असाही आग्रह धरण्यात आला. परंतु, या मागण्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. नाट्यगृहाच्या संदर्भात नगरपरिषदेची एकदाही बैठक झाली नाही, अशी खंत पत्रकार परिषदेत कलावंतांनी व्यक्त केली.
प्रशासनाचा निषेध म्हणून अर्धवट रंगमंचावर कलावंतांनी विविध कला सादर केल्या. या अभिनव आंदोलनात युवा नाट्यकलावंत केतन पळसकर, अभिषेक श्रीकुंडावार, साक्षी महाजन, किरण साहू, निखिल राठोड, मुक्तिका वाटखेडकर, निशांत सिडाम, निजर खराबे, दिनेश इंगोले, नितीन ठाकरे, अभिषेक यादव, पुष्कर सराड, सतीश पवार, प्रेम निनगुरकर, नितीन चौधरी, आकाश सैत्वाला, साक्षी निनगुरकर, निखिल राठोड, वैभव देशमुख, अपूर्वा मोने, स्वराली थेटे, अनन्या थेटे, अक्षय सोयाम, निमहिल यादव, अहुभाम आडे, मयूर नाटकर, सौरभ विठाळकर, चेतन धनेवर, शुभम राऊत, गौरव ठोंबरे, सतीश पवार, कमलेश देशपांडे, श्रृती क्षीरसागर, अनुराधा घोडे, प्रतीक दर्यापूरकर, आशांता बुटले, अनुराधा घोडे आदी सहभागी होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Young Artists' ultimatum to dramatics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.