युवांची गर्दी : बाजारपेठ सज्ज, शुभेच्छापत्र, बँडसह विविध वस्तूंची रेलचेल यवतमाळ : मोबाईलमुळे जग मुठीत आलं. व्हॉट्सअॅप, टिष्ट्वटर, फेसबुकवर दररोज मित्र जुळतात. ही हायटेक मैत्री मित्रत्वाची भावना वृद्धिंगत होण्यापूर्वीच तुटते. यातील काही मोजकेच मित्र आपल्या जवळचे होतात. आपल्याशी जुळलेला प्रत्येक मित्र आयुष्याच्या कठीण प्रसंगी आपल्यासोबत असावा म्हणून प्रत्येक तरुण मैत्री जपतो. मैत्रीच्या या धाग्याला अधिक घट्ट करण्यासाठी फ्रेंडशिप डे साजरा करण्यात येतो. पाश्चिमात्य संस्कृतीमधील हा दिवस साजरा करण्याचे फॅड अलिकडे वाढत चालले आहे. रविवारी साजरा होत असलेल्या मैत्रीदिनाकरिता बाजारपेठही सज्ज झाली आहे. मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत देतो कारण जे चांगले आहे ते साथ देतील आणि जे वाईट असतील ते अनुभव देतील याप्रमाणे अनेक सुंदर संदेश लिहिलेली शुभेच्छापत्रे बाजारात आली आहेत. मित्रत्वाची भावना, प्रियकर आणि पे्रयसीची मैत्री, जीवलग मित्रांची मैत्री यासारखे विविध भावार्थ सांगणारी शुभेच्छापत्रे बाजारात आहेत. या शुभेच्छापत्रांना खरेदी करण्यासाठी बाजारात तरुण आणि तरूणींची गर्दी उसळली आहे. महाविद्यालयीन तरुणांपर्यंत मर्यादित असलेली मैत्रदिनाची संकल्पना आता शाळेपर्यंतही पोहोचली आहे. यासाठी खास फ्रेंडशिप बँड आणि अंगठ्या बाजारात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालयापुढील दुकानांमध्ये हे फ्रेंडशिप बेल्ट, अंगठ्या सहज उपलब्ध होतात. प्रत्येकाच्या पॉकेटमनीला झेपेल इतक्या स्वस्त दरात हे बेल्ट उपलब्ध होतात. प्लास्टिक आणि धाग्याच्या रूपात, तसेच धातूमध्ये बनविलेले हे बँड खरेदी करण्यासाठी शाळा, महाविद्यालयापासून उच्चशिक्षित विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच गर्दी करताना दिसत आहेत. शुभेच्छा गॅलरीमध्ये तरुण आणि तरुणींचा पे्रमभाव लक्षात घेता मैत्रदिनाचे गिफ्ट बाजारात आणले आहेत. परफ्यूम, टॉईज, कोलाज फ्रेम, ज्वेलरीचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. यासाठी शहारातील दुकाने सजली आहेत. पूर्वी या दुकानांमध्ये पाच ते सहा दिवस आधीपासूनच युवकांची गर्दी असायची. आता फ्रेंडशिप डेच्या दिवशीच गर्दी पाहायला मिळते. (शहर वार्ताहर)
मैत्रीचा धागा घट्ट करण्यासाठी सरसावली तरुणाई
By admin | Published: August 07, 2016 1:20 AM