अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 08:49 AM2024-04-29T08:49:19+5:302024-04-29T08:49:45+5:30

Amit Shah : गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. 

delhi police fir against amit shah fake video claiming remove reservation telangana congress share | अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर

अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बनावट व्हिडिओप्रकरणी रविवारी (28 एप्रिल) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या बनावट व्हिडीओमध्ये कथितपणे एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण संपवण्याबाबत बोलताना दिसत आहेत, मात्र, पीटीआयच्या फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडीओ बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. यानंतर गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. 

बनावट व्हिडीओमध्ये भाजपा नेते अमित शाह सरकार स्थापन होताच एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल असे सांगत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच, सरकार स्थापन होताच केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण काढून टाकण्याचे बोलले होते. दरम्यान, अलीकडेच कर्नाटक सरकारने मुस्लिमांचा ओबीसी यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. 

याप्रकरणी आता अमित शाहांचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या सर्व लोकांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल सायबर विंगने आयपीसीच्या कलम 153/1530ए/465/469/171जी आणि आयटी कायद्याच्या कलम 66सी अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

अमित शहा काय म्हणाले?
या बनावट व्हिडीओप्रकरणी अमित शाह यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. अमित शाह यांनी एएनआयशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राहुल गांधी आणि काँग्रेस आरक्षणाबाबत देशवासीयांची दिशाभूल करत आहेत. तुष्टीकरणासाठी काँग्रेसने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात अल्पसंख्याकांना आरक्षण देऊन आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला आहे. एससी-एसटी, ओबीसींना जामिया आणि एएमयूसारख्या संस्थांमध्ये वंचित ठेवले आहे. पण मोदीजींची ही हमी आहे की जोपर्यंत भाजपा आहे, काँग्रेस आरक्षणाला हातही लावू शकणार नाही.

बनावट व्हिडीओप्रकरणी अमित मालवीय काय म्हणाले?
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी 27 एप्रिल रोजी अमित शाहांचा तेलंगणा काँग्रेसकडून फेसबुकवर शेअर केलेला बनावट  व्हिडीओ पोस्ट करत म्हटले होते की, तेलंगणा काँग्रेस एक व्हिडीओ पसरवत आहे, जो पूर्णपणे बनावट आहे. या व्हिडीओमुळे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित शाह हे एससी/एसटी आणि ओबीसीचा वाटा कमी करून असंवैधानिक पद्धतीने मुस्लिमांना दिलेले आरक्षण काढून टाकण्याबाबत बोलताना दिसत आहेत. हा बनावट व्हिडीओ काँग्रेसच्या अनेक प्रवक्त्यांनी पोस्ट केला आहे. त्यामुळे आता त्यांनी कायदेशीर कारवाईसाठी तयार राहावे, असा इशाराही अमित मालवीय यांनी दिला होता.

Web Title: delhi police fir against amit shah fake video claiming remove reservation telangana congress share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.