अकोला : राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आज उद्घाटन; स्पर्धेकरिता तीन रिंक सज्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:40 AM2018-01-20T01:40:55+5:302018-01-20T01:42:05+5:30
अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा - २0१७-१८ (१९ वर्षाआतील मुले-मुली) चे उद्घाटन शनिवार, २0 जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, संगीतकार वसंत देसाई स्टेडिअम, अकोला येथे गृह राज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा - २0१७-१८ (१९ वर्षाआतील मुले-मुली) चे उद्घाटन शनिवार, २0 जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, संगीतकार वसंत देसाई स्टेडिअम, अकोला येथे गृह राज्यमंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार संजय धोत्रे राहतील. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आमदार गोपीकिसन बाजोरिया, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकाळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार बळीराम सिरस्कार, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अमरावती विभाग क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव जय कोहली, आंतरराष्ट्रीय बॉक्सर कॅप्टन देवीचंद व विजेंद्र मल यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
खेळाडूंची निघणार रॅली
२४ जानेवारीपर्यंत चालणार्या या स्पर्धेतील सहभागी शालेय खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, याकरिता शनिवारी स्पर्धा उद्घाटनापूर्वी दुपारी १ वाजता शासकीय अध्यापक महाविद्यालय येथून रॅली निघणार आहे. रॅली दुर्गा चौकातून मार्गक्रमण करीत स्पर्धास्थळी पोहोचणार आहे.
खेळाडूंची वैद्यकीय व वजन गट तपासणी
देशभरातून आलेल्या ४१८ खेळाडूंची शुक्रवार, १९ जानेवारी रोजी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच खेळाडूंचा निश्चित वजन गट ठरविण्याकरिता वजन घेण्यात आले. स्पर्धेत गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व कश्मीर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, सीबीएसई, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, विद्याभारती, चंदीगड, दिल्ली, डीएव्ही, बिहार, आयपीएससी, केंद्रीय विद्यालय संघटन, ओडिशा, उत्तर प्रदेश संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये २४७ मुले व १७१ मुलींचा समावेश आहे.
विद्यार्थी बघतील लढती
या स्पर्धेतील लढती जिल्हय़ातील विद्यार्थ्यांना बघता याव्या, याकरिता जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मुख्याध्यापकांना सूचनापत्र पाठविले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉक्सरांचा खेळ पाहून जिल्हय़ामधून उत्तम बॉक्सर तयार व्हावे, हा उपक्रमामागील उद्देश आहे.
तीन रिंक सज्ज
या स्पर्धेनिमित्त वसंत देसाई स्टेडिअम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तीन बॉक्सिंग रिंक तयार करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी या तिन्ही रिंकची चाचणी आयोजकांमार्फत घेण्यात येऊन, कोणतीही त्रुटी यामध्ये निघाली नाही.