महात्मा गांधींच्या विचारांचा शाळांमध्ये होणार जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:39 PM2018-08-24T12:39:14+5:302018-08-24T12:39:46+5:30
महात्मा गांधींची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती २ आॅक्टोबर रोजी साजरी होणार असून, त्यानिमित्त वर्षभर शालेय पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संबंधित शाळांना केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महात्मा गांधींची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती २ आॅक्टोबर रोजी साजरी होणार असून, त्यानिमित्त वर्षभर शालेय पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संबंधित शाळांना केल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रपित्याच्या विचारांचा जागर वर्षभर शालेय पातळीवर होणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत शालेय स्तरावर असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, भारत छोडो आंदोलन या विषयावर निबंध स्पर्धा, शाळांमध्ये विज्ञान जत्रा, विज्ञान प्रदर्शन, ज्यामध्ये प्राधान्याने स्वच्छ भारत मिशन जलसंधारण या विषयावर वैज्ञानिक उपकरणांची मांडणी करणे, त्याचबरोबर सौरऊर्जा प्रसारावर भर, गांधींच्या विचारावर आधारित चित्रकला स्पर्धा, स्वातंत्र्य चळवळीतील गांधीजींचे योगदान या विषयावर प्रश्नमंजूषा, गांधीवादी विचारसरणीच्या लोकांची व्याख्याने आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे. संपूर्ण वर्षभर हे कार्यक्रम शैक्षणिक संस्था व प्राथमिक शाळांमध्ये घेऊन कार्यक्रम घेतल्याबाबत लेखी अहवाल शिक्षणधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे.
पालक-शिक्षक वर्गातून समाधान
वर्षभर महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्याच्या निर्णयामुळे नव्या पिढीपर्यंत महात्मा गांधींचे विचार पोहोचविणे सहज शक्य होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे पालकवर्ग व शिक्षण विभागाकडून स्वागत होत आहे.
महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती वर्षाचा शुभारंभ २ आॅक्टोबर रोजी होत असून या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
- आर.डी तुरणकर,शिक्षणाधिकारी प्राथमिक