नववीतल्या पोराची 'डोकॅलिटी'; हेल्मेट घातल्याशिवाय सुरूच होणार नाही दुचाकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 04:24 PM2019-01-31T16:24:39+5:302019-01-31T16:24:56+5:30
हेल्मेट वापराबाबतच्या जनजागृतीसाठी सरकारकडून जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. मद्यपान करून गाडी चालवू नका, हेल्मेट घाला- सुरक्षित प्रवास करा...
औरंगाबाद - हेल्मेट सक्तीविरोधात पोलिस प्रशासाने कठोर पाऊलं उचलली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नागरिकांकडून हेल्मेट सक्तीला विरोध होत आहे. तर, जीव जाण्यापेक्षा हेल्मेट घातलेलंच बरं असेही अनेकांच म्हणणं आहे. औरंगाबादमध्ये इयत्ता नववी शिकणाऱ्या विस्मय विनोद तोतलाने एक भन्नाट शोध लावला आहे. जर, तुम्ही हेल्मेट घातले नाही, तर तुमची गाडीच सुरू होणार नाही, असे यंत्र विस्मयने बनवले आहे. विशेष म्हणजे तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे तुमच्या कुटुबीयांना लगेच मेसेजही मिळणार आहे.
हेल्मेट वापराबाबतच्या जनजागृतीसाठी सरकारकडून जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. मद्यपान करून गाडी चालवू नका, हेल्मेट घाला- सुरक्षित प्रवास करा.... अशा कितीतरी जाहिरातींवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, औरंगाबादेतील एका शाळकरी मुलाने भन्नाट शोध लावून हेल्मेटचा वापर अनिवार्य केला आहे. औरंगाबदमधील नाथ व्हॅली स्कूल या शाळेत नववीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने आयडियाची कल्पना लढवली आहे. या स्मार्ट हेल्मेटची कमाल म्हणजे, डोक्यावर हेल्मेट घालून बसल्याशिवाय दुचाकी सुरुच होणार नाही.इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या विस्मय विनोद तोतलाने (12 वर्षे) केलेल्या संशोधनानुसार, तुम्ही हेल्मेट घातले तर तुमची गाडी सुरू होणार, जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल तर थेट तुमच्या घरी तसा संदेश जाईल. त्यानंतर तुमचं लोकेशनही तुमच्या घरी जाईल आणि तुमची गाडीच सुरू होणार नाही. विस्मयने केलेल्या या संशोधनाची निवड देशपातळीवरील विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. या भन्नाट स्मार्ट हेल्मेटच्या निर्मितीसाठी विस्मयला एक महिन्याचा कालावधी लागला. या हेल्मेटमध्ये आर. एफ. ट्रान्समीटर, रिसीव्हर, अल्कोहल सेंसर, लिमिट स्वीचेस, जीपीएस अॅन्टिना या उपकरणांचा वापर करण्यात आला आहे.
दरम्यान, हेल्मेट सक्ती रद्द करावी या मागणीसाठी पुण्यात हेल्मेट विरोधी कृती समितीने महापालिकेच्या नवीन इमारतीमध्ये आंदोलन केले. महापौरांच्या कक्षाबाहेर तसेच मुख्य सभागृहामध्ये जोरदार घोषणाबाजी केली होती. 2001 साली राज्य शासनाने परिपत्रक काढून महामार्गावर हेल्मेट घालणे बंधनकारक केले होते. तर शहरी भागात हेल्मेट सक्ती नसल्याचे म्हटले होते. मात्र, त्यावर न्यायालयाने हे परिपत्रक चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे 2003 साली परिपत्रक काढून शासनाने आधिचे परिपत्रक रद्द केले होते.