मारुतीने का घेतली डिझेलमधून एक्झिट? ही आहेत तीन मुख्य कारणे
By हेमंत बावकर | Published: April 26, 2019 09:29 AM2019-04-26T09:29:49+5:302019-04-26T10:27:09+5:30
मारुती आजवर फियाटची इंजिने वापर होती. यामुळे मारुतीला संशोधनावर पैसा गुंतवावा लागत नव्हता. तरीही मोठा महसूल हा फियाटला जात होता. यामुळे मारुतीन 5-6 वर्षांपूर्वीच स्वत:ची इंजिने विकसित करण्याचा निर्णय घेतला.
- हेमंत बावकर
मुंबई : देशातील सर्वात मोठी कारनिर्मिती करणारी कंपनी मारुती सुझुकीने डिझेल कार विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे वाहनप्रेमींसह उद्योगविश्वामध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, यामागच्या कारणांचा विचार केल्यास मारुतीचा निर्णय योग्य वाटतो. आर्थिक गणितांबरोबर मारुतीने सरकारी नियमावलींमुळे होणाऱ्या परिणामांची सांगड घातली आहे.
तसे पाहता मारुती आजवर फियाटची इंजिने वापर होती. यामुळे मारुतीला संशोधनावर पैसा गुंतवावा लागत नव्हता. तरीही मोठा महसूल हा फियाटला जात होता. यामुळे मारुतीन 5-6 वर्षांपूर्वीच स्वत:ची इंजिने विकसित करण्याचा निर्णय घेतला. या काळात मारुतीने आजवर फियाटचीच 1.3 मल्टीजेट इंजिन वापरली. हे इंजिन कमालीचे यशस्वीही होते. मायलेज, परवडणारे आणि जास्त मेन्टेनन्स न देणारे असे हे इंजिन होते. यामुळे मारुतीने सरसकट सर्व गाड्यांमध्ये हे इंजिन दिले होते. मारुतीची डिझेल कारची विक्री पाहता एकूण विक्रीपैकी निम्म्याहून जास्त कार या डिझेलच्या आहेत. यामुळे लाखो कोटींचा महसूल हा फियाटला द्यावा लागत होता. यामुळे मारुतीने तेव्हा 1700 कोटी रुपये गुंतवून गुरगावमध्ये डिझेल इंजिन बनविण्याचा प्रकल्प उभारला. यामध्ये कंपनीचे हजारो कोटी रुपये गुंतलेले आहेत.
असे असताना भारत सरकारने एकाएकी डिझेलच्या कार 2030 पर्यंत बंद करण्याचा आणि सीएनजी, वीजेवर चालणाऱ्या कार विक्री करण्याचा निर्णय घेतला. याचा पहिला फटका मारुतीच्या भविष्यातील वाढीवर बसला. मारुतीने या काळात 1.5 लीटरचे इंजिन विकसितही केले. हे इंजिन एस क्रॉस, सियाझ या कारमध्ये देण्यात आले आहे. मात्र, एवढा मोठा खर्च करून हे इंजिन काही काळानंतर कालबाह्य होणार याची धास्ती कंपनीला आहे. यातच बीएस 6 उत्सर्जन नियमावलीचे डिझेल इंजिन बनवायचे झाल्यास सध्याच्या बीएस 4 इंजिनापेक्षा त्याची किंमत 2.50 लाख रुपयांनी जास्त असणार आहे. यामुळे सहाजिकच ग्राहकवर्ग पेट्रोलच्या कारपेक्षा 2.5 लाख रुपयांनी जास्त किंमत असलेल्या कारकडे कसा वळणार? हा ही विचार कंपनीने केला आहे.
महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या पेट्रोल डिझेलचे चढे भाव हे ही एक मोठे कारण यामागे आहे. काही वर्षांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलमधील किमतीमध्ये 20 ते 25 रुपयांचे अंतर होते. आज हेच अंतर सहा-सात रुपयांवर आले आहे. भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमती समपातळीवर येतील. यामुळे 2-4 किमीच्या मायलेजसाठी कोणी जादाचे 2.5 लाख रुपये देण्याचे धारिष्ट्य दाखवेल असे वाटत नाही. कारण हा जादाचा पैसा आणि त्यावरील व्याज याचा विचार करता हे पैसे वसूल होण्यासाठी 10 ते 12 वर्षे लागतील. यामुळे भविष्यात डिझेलची कार घेणे हा आतबट्ट्याचाच व्यवहार ठरणार आहे.
यापेक्षा पेट्रोल कारलाचा 50-60 हजार रुपये मोजून सीएनजीची कार घेतल्यास त्याचा पर्यावरणावर आणि पर्यायाने खर्चावर फायदा होणार आहे. सध्या सीएनजी फक्त मेट्रो शहरांमध्येच उपलब्ध असला तरीही येत्या दोन वर्षांत तो अन्य ठिकाणीही मिळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरु आहेत. विजेवर चालणाऱ्या वाहनांनी अद्यापही बाळसे धरलेले नाही. यामुळे सध्यातरी पुढील 10-12 वर्षांसाठी सीएनजीचाच पर्याय कंपनीसमोर आहे. आणि आता बाजारात मारुतीच्या सीएनजी कारनी चांगलेच बस्तान बसविले आहे. यामुळे मारुतीने खर्चात कपात करण्यासाठी 1 एप्रिल 2020 पासून डिझेल कार विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोल कार घ्यायची की डिझेल? प्रश्न पडतोय का... वाचा...
फोक्सवॅगनचाही निर्णय
असे करणारी मारुती ही एकटीच कंपनी नसून काही महिन्यांपूर्वी फोक्सवॅगन कंपनीनेही 2024 पासून पेट्रोल, डिझेलच्या कार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आता वाहनक्षेत्र नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर असल्याने अन्य कंपन्यांकडूनही हे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे.