बुलडाणा विभाग : एसटी गाड्यांच्या ७६ अपघातांपैकी ५२ अपघातामध्ये चालक जबाबदार; प्राथमिक अहवालातील माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 06:40 PM2018-01-19T18:40:09+5:302018-01-19T18:44:41+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात प्रतीदिन तब्बल एक लाख ३६ हजार ५०७ व्यक्ती प्रवास करती असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातंर्गत २०१७ मध्ये बसगाड्यांचे ७६ अपघात झाल्याची माहिती सध्या सुरू असलेल्या सुरक्षितता मोहिमेतंर्गत समोर आली आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा : जिल्ह्यात प्रतीदिन तब्बल एक लाख ३६ हजार ५०७ व्यक्ती प्रवास करती असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातंर्गत २०१७ मध्ये बसगाड्यांचे ७६ अपघात झाल्याची माहिती सध्या सुरू असलेल्या सुरक्षितता मोहिमेतंर्गत समोर आली आहे. दरम्यान, या पैकी तब्बल ५२ अपघातामध्ये प्राथमिकस्तरावरील चौकशी अहवालात चालक जबाबदार असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. दुसरीकडे २०१६ पासून सुरू केलेल्या अपघात सहाय्यता निधी योजनेसाठी प्रतितिकिटावर आकरण्यात येणार्या एक रुपया अधिभारापोटी संपलेल्या वर्षात चार कोटी २२ लाख ५७६ रुपयांचा निधी जमा झाला. गेल्या ७० वर्षाच्या काळात एसटीने सुरक्षीत प्रवास अशी ओळख निर्माण केली असली तरी गेल्या वर्षभरात बुलडाणा विभागातंर्गत बसगाड्यांचे ७६ अपघात झाले आहेत. त्यामुळे अपघात मुक्त एसटी असे लक्ष सध्या ठेवण्यात आले असून त्यासाठीच ही सुरक्षितता मोहीम हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार १० ते २५ जानेवारी दरम्यान ही मोहिम राबविण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या वर्षात एसटीचे ७६ अपघात झाले असून ११ अपघात हे प्राणांतिक स्वरुपाचे झाले आहेत. तर गंभीर स्वरुपाचे ४८ तर किरकोळ स्वरुपाचे १७ अपघात झाले आहे. यामध्ये तब्बल ५२ अपघाताच्या प्रकरणात प्राथमिक चौकशीत बस चालक जबाबदार असल्याचे समोर आले आहे. तर २४ अपघातामध्ये अन्य वाहनाचे चालक अपघातास जबाबदार तर यांत्रिक त्रुटीमुळे २०१६ मध्ये एक अपघात झाल्याचे पाहणीत समोर आले आहे. बसगाड्यांची हालतही खस्ता झाली आहे. लांबपल्ल्याच्या बसगाड्या ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाणही अलिकडील काळात वाढले आहे. सुरक्षितता मोहिमेंतंर्गत त्या दृष्टीनेही तपास होण्याची गरज प्रतिपादीत होत आहे. नाही म्हणायला सरत्या वर्षात विना अपघात सेवा देणार्या १४५ चालकांना बिल्ले वाटप करण्यात येऊन ३६३ बस चालकांना बक्षीसही देण्यात आले आहे. २६० दिवस अपघात विरहीत सेवा देणार्या चालकांना हे बक्षीस दिल्या जाते. प्राथमिक तपासणीमध्ये ५२ चालक गेल्या वर्षात जबाबदार असल्याचे दिसून आले असून डीफॉल्ट सेक्शनमध्ये अशा चालकांवर कारवाई करण्यात येते. त्यांना पुन्हा प्रशिक्षण दिल्याने अपघातावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होत असल्याचे सुत्रांनी सांगितले.