बुलडाणा : सावजींचे गुरुवारपासून विहिरीत बसून आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:32 AM2018-01-18T01:32:58+5:302018-01-18T01:36:46+5:30
झालेल्या गैरप्रकाराविरोधात शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ जानेवारीपासून मेहकर तालुक्यातील बोरी येथील विहिरीत बसून आपण आंदोलन छेडणार असल्याची माहिती माजी मंत्री सुबोध सावजी यांनी १७ जानेवारीला बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील १,४२0 गावातील शासकीय नळपाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार, अनियमितता झाल्याने या योजना कागदोपत्रीच दिसत असून, अनेक गावांत गेल्या ३0 वर्षांपासून ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमतामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई सुरू आहे. यामध्ये झालेल्या गैरप्रकाराविरोधात शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ जानेवारीपासून मेहकर तालुक्यातील बोरी येथील विहिरीत बसून आपण आंदोलन छेडणार असल्याची माहिती माजी मंत्री सुबोध सावजी यांनी १७ जानेवारीला बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक जिजामाता क्रीडा संकुलातील जिमखाना सभागृहात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी नळ पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष वा. रा. पिसेही उपस्थित होते. सुबोध सावजी म्हणाले की, प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधून पाणीपुरवठा नळयोजना, रस्ते, एसटी बस, दिवाबत्तीची माहिती घेऊन शासकीय नळ योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी सदस्यांनी रजिस्टर बुकमध्ये नोंद केली आहे. मेहकर तालुक्यातील १४२ गावात पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष गावात जाऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त तसेच किडनीग्रस्त मृत कुटुंबाचे सांत्वन करून २७ कुटुंबांना प्रत्येकी १0 हजार रुपयांची वैयक्तिक मदत दिली.
१४२ गावात नळपाणीपुरवठा योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारामुळे गावात नळ योजनेचे पाणी मिळत नाही. पारखेड, वाघदेव, नागेशवाडी येथे अर्धवट जलवाहिनी टाकल्याने १५ वर्षांपासून पाणी नाही. टेंभुरखेड गावात जलस्वराज्य योजनेचे पाइपच चोरीला गेले. स्वीच रूमचा वापर कडबा कुटार भरण्यासाठी होतो. घाटबोरी येथे १९८६ च्या नळयोजना जलस्वराज्य माध्यमातून पाण्याची टाकी बांधलेली आहे. पाइपलाइन जोडली; परंतु मोटरपंप नसल्याने गावात पाणी मिळत नाही. मोळा गावात शासकीय विहिरीचे पाणी खासगी शेती पिकांसाठी होते. पाण्याची टाकी नादुस्त आहे. यासह अन्य गावातील स्थितीची त्यांनी माहिती दिली. डोणगावात १९९0 पर्यंतच्या दोन पाणी पाणीपुरवठा सुरू आहेत. महिन्यातून एकदा पाणी मिळते. जलस्वराजची पावणे पाच कोटींच्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपी त्यांनी केले.
जिल्हाधिकार्यांनी बोलावली बैठक
जळगाव जामोद येथे उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात १५ नोव्हेंबर रोजी बैठा सत्याग्रह करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन २२ जानेवारीला जिल्हाधिकार्यांनी समिती पदाधिकारी व सदस्यांची दुपारी चार वाजता बैठक आयोजित केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.