बुलडाणा : दाताळा येथे विवाहितेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:52 AM2018-01-01T01:52:29+5:302018-01-01T01:53:54+5:30
मलकापूर (बुलडाणा): किरकोळ कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळींनी धारदार शस्त्राने वार करून २३ वर्षीय विवाहितेची हत्या केल्याची घटना मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे रविवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर (बुलडाणा): किरकोळ कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळींनी धारदार शस्त्राने वार करून २३ वर्षीय विवाहितेची हत्या केल्याची घटना मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे रविवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मृत विवाहितेच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून मृत महिलेचा नवरा, सासू, सासरा आणि नणंद अशा चार जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मृत विवाहितेच्या पतीनेही विष प्राशन केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असून, त्यास बुलडाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
रेखा योगेश तायडे (वय २३) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा विवाह हा दाताळा येथील रहिवासी योगेश दिगंबर तायडे (२८) याच्याशी झाला होता. तिला सासरी क्षुल्लक कारणावरून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. त्याचे पर्यवसान खुनात झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यासंदर्भात मृत विवाहितेचे पिता कैलास नामदेव गव्हाळे (वय ५१ रा., घिर्णी, ता. मलकापूर) यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले की, रेखा हिला तिच्या सासू व पतीकडून घरगुती कारणावरून वारंवार मारहाण होत असे. नणंद विजया शेगोकार व सासरे प्रल्हाद तायडे दोघे त्यासाठी भडकविण्याचे काम करीत होते. दरम्यान, रविवारी सासू व पती यांनी संगनमताने धारदार शस्त्राने रेखाच्या गळ्यावर, डोक्यावर, मनगटावर, पायावर सपासप वार करून तिची हत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी कैलास गव्हाळे यांच्या फिर्यादीवरून मृतक विवाहितेचा पती योगेश दिगंबर तायडे (वय २८), सासू गं.भा. निर्मला दिगंबर तायडे (वय ५८), सासरा प्रल्हाद तुळशिराम तायडे (वय ५२, रा. दाताळा) आणि नणंद विजया जगन्नाथ शेगोकार (वय ३0, रा. मलकापूर) अशा चौघांविरुद्ध अपराध नं. २४२/१७ कलम ३0२, ४९८ अ, ३४ भादंविचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय साळुंके हे करीत आहेत. मृत रेखा रक्ताच्या थारोळ्य़ात दाताळ्य़ातील भगवान गल्लीत राहत्या घरी पडली होती. घटनेची वार्ता गावभर लगोलग पसरली. नागरिक जमा झाले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावली. स्थानिक डॉक्टरांनी रेखाला मृत घोषित केले. त्यामुळे शासकीय कर्मचार्यांनी मृतदेह नेण्यास नकार दिला. परिणामी खासगी वाहनास पाचारण करण्यात आले. मृतदेह मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. त्यावेळी मृत विवाहितेस माहेराहून शेताच्या हिश्शाचे पैसे माग, असा तकादा सासरच्यांनी लावला होता, अशी चर्चा घटनास्थळी असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.