खदानीत बुडून दोन युवकांचा मृत्यू, बर्डे प्लॉट व फाटकपुरा भागात शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 09:25 PM2018-09-05T21:25:08+5:302018-09-05T21:25:27+5:30
खामगाव : शहरापासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या माथनी येथील खदानमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून करुण अंत झाला. ही घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
खामगाव शहरातील मस्तान चौक परिसरातील रहिवाशी शेख सिकंदर शेख कादर (वय १९) व बर्डे प्लाटमधील रहिवाशी शेख जुबेर शेख महबूब (वय २०) हे दोघे आपल्या मित्रासोबत आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास माथनी येथील खदानमध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेले. त्यांना पोहता येत नसल्यानंतरही मित्रांच्या आग्रहास्तव त्यांनी उडी टाकली. मात्र पाणी जास्त असल्याने ते खदानीतील कपारीत बुडाले. त्याठिकाणी उपस्थित सैयद इस्माइल, सैयद सही यांनी नागरिकांच्या आणि गावकऱ्यांच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तातडीने त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी दोघानांही डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ, माजी नगरसेवक मो.नईम, अन्सार भाई, बबलु पठान, हाफीज साहेब यांच्यासह मुस्लीम समाज बांधव व नागरीक उपस्थित होते. या घटनेचे वृत्त पसरताच सामान्य रुग्णालयात नागरीकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील, शहर पो.स्टे. चे ठाणेदार संतोष टाले हे देखील सामान्य रुग्णालयात दाखल झाले. यावेळी रुग्णालयात परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. मुस्लीम समाजातील दोन तरुणांचा या घटनेत दुदेर्वी मृत्यू झाल्याने बर्डे प्लॉट व फाटकपुरा भागात शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
लोकप्रतिनिधींची रुग्णालयात धाव
या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सामान्य रुग्णालयात धाव घेतली. घटनेची माहिती घेत मृतकाच्या कुटुंबियांचे सात्वंन केले. याशिवाय आमदार आकाश फुंडकर यांनी दुख:द संवेदना व्यक्त केल्यात. भाजप मिडिया सेलचे सदस्य सागर फुंडकर यांनी सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन विभागात जाऊन नातलगांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.