बुलडाण्याच्या भूमिपुत्राला पद्मश्री, डॉ. रविंद्र कोल्हे व स्मिता कोल्हे यांच्या वैद्यकीय सेवेची दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 02:10 PM2019-01-27T14:10:27+5:302019-01-27T15:04:44+5:30
मेळघाटात गेल्या ३५ वर्षापासून आदिवासी बांधवांना अविरतपणे रुग्णसेवा देणारे डॉ. रविंद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
योगेश फरपट / दिलीप इंगळे
वसाडी ता. नांदुरा - मेळघाटात गेल्या ३५ वर्षापासून आदिवासी बांधवांना अविरतपणे रुग्णसेवा देणारे डॉ. रविंद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. रविंद्र कोल्हे हे मुळचे नांदुरा तालुक्यातील वसाडी येथील रहिवाशी असून जिल्हयासाठीच नव्हेतर राज्यासाठी ही गौरवाची बाब आहे.
प्रजासत्ताक दिनी केंद्र सरकारने पद्मविभूषण व पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली. त्यात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ. रविंद्र कोल्हे व स्मिता कोल्हे यांचाही सहभाग आहे. देशात बुलडाणा जिल्हयाचे नावलौकीक करणारे पद्मश्रीचे मानकरी डॉ. रविंद्र कोल्हे व स्मिता कोल्हे हे नांदुरा तालुक्यातील वसाडी येथील रहिवाशी आहेत. कोल्हे दाम्पत्य सध्या मेळघाटमधील बैरागड येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. या अतिदुर्गम भागात ज्यांना दारिद्र्याने पोखरले होते. साथीच्या आजाराने आदीवासी ग्रासले होते. निमोनिया व डायरीयामुळे दर दिवसाला १० ते १२ व्यक्तींचा मृत्यू होत होता. अशा काळात म्हणजे १९८४ ला डॉ. रविंद्र कोल्हे यांनी मेळघाटात आदिवासींची सेवा करण्याचा निर्णय घेतला. जवळपास ३५ वर्षापासून अविरतपणे कोल्हे दाम्पत्य त्याठिकाणी सेवा देत आहेत. एवढेच नाहीतर त्यांनी मुलाबाळासह तिकडेच संसार थाटला आहे. त्यांच्या या आदीवासींच्या वेदनांवर फुंकर घालण्याच्या कामाची दखल घेवून सरकारने त्यांना पद्मश्री जाहिर केला आहे. बुलडाणा जिल्हयातीलच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही गौरवाची बाब आहे. पुरस्काराच्या घोषणेनंतर गावात सुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. रविंद्र कोल्हे यांचा रोहीत हा मोठा मुलगा सध्या मेळघाटात शेती करतोय तर लहान मुलगा राम हा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
आदिवासींच्या जीवनात बदल
केवळ रुग्णसेवाच नव्हे तर आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणण्याचे काम डॉ. रविंद्र कोल्हे यांनी केले. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले असतानाही अकोला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी शिक्षण घेतले. त्या शिक्षणाचा वापर त्यांनी मेळघाट शेती करण्यासाठी केला. आदीवासींना शेती करण्यासाठी प्रवृत्त केले. मेळघाटातील कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी कोल्हे दाम्पत्यांचे कार्य महान आहे.
माझा पुतण्या रविंद्र कोल्हे व स्मिता कोल्हे हे दोघेही आदिवासी लोकांची सेवा करीत असून ही आमच्या घराण्यासाठी अभिमानाची बाब आहे. सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. इतर वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी त्यांचे अनुकरण करून सेवा दिल्यास त्यांना मिळालेला पद्मश्री सार्थक ठरेल.
- वामन त्र्यंबक कोल्हे, वसाडी
डॉ. कोल्हे दाम्पत्यांना वैद्यकीय क्षेत्रात आदीवासी भागात अहोरात्र सेवा दिल्याबदद्ल त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. ज्या कोल्हे कुटूंबियांचे नाव वसाडी या गावाचे नाव भारतात नावलौकिक केले. अशा गावाचे सरपंचपद भुषवण्यात मला अभिमान आहे. त्यांनी केलेल्या कामाची प्रेरणा घेवून गाव विकासाकडे नेण्याचा प्रयत्न करेल.
- वनिता बळीराम गिऱ्हे, सरपंच, वसाडी