१५ वर्षात कामे केली असती तर दुष्काळ हटला असता : सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 04:31 PM2018-10-27T16:31:19+5:302018-10-27T16:39:52+5:30
बुलडाणा: सत्तेत असताना गेल्या १५ वर्षात कामे केली असती तर राज्यातील दुष्काळ हटला असता असा खोचक टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे.
बुलडाणा: सत्तेत असताना गेल्या १५ वर्षात कामे केली असती तर राज्यातील दुष्काळ हटला असता असा खोचक टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. दोन दिवसापूर्वी चिखलीतील एका कार्यक्रमासाठी शरद पवार आले असता राज्यात दुष्काळ सदृश्य नव्हे तर दुष्काळच असल्याचे शरद पवार म्हणाले होते. त्यानुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषी राज्यमंत्री सदभाऊ खोत यांनी उपरोक्त वक्तव्य केले. यावेळी त्यांच्या समवेत भाजपेच आ. डॉ. संजय कुटे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये शनिवारी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती.दुष्काळ सदृश्य स्थितीची तालुका निहाय पहाणी करण्यासाठी खोत दोन दिवसापासून जिल्ह्यात तळ ठोकून होते. शनिवारी सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईसदृश्य स्थितीबाबत आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उपरोक्त वक्तव्य केले. दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकार शब्दांचा खेळ करीत असून शरद पवारांनी दुष्काळ सदृश्य नव्हे तर दुष्काळच असल्याचे वक्तव्य केल्याबाबत त्यांना विचारणा केली होती. त्यानुषंगाने ते बोलत होते. सध्याच्या दुष्काळ सदृश्यस्थितीत एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा हातात हात घालून दुष्काळाचा सामना करण्यास प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी बोलताना प्रतिपादीत केली. आपल्या सारख्या सामान्य माणसाने शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्याबाबत बोलणे योग्य ठरणार नाही. ते जेष्ठ नेते आहेत. शासन, प्रशासनाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याचे नियम व अटी त्यांना माहित आहे. दुष्काळ कधी जाहीर करावा लागतो, याचीही त्यांना कल्पना आहे. १५ वर्षामध्ये योग्य काम झाले असते तर बर्यापैकी राज्यातील दुष्काळ हटला असता असे ते शेवटी म्हणाले. दरम्यान, आपण आतापर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्हयांचा दुष्काळ सदृश्य स्थिती पाहता दौरा केला आहे. सोबतच शक्य होईल तेवढ्या भागाचा दौरा करून सविस्त माहिती संकलीत करत असल्याचेही कृषी राज्यमंत्री खोत यावेळी बोलताना म्हणाले. १९७२ प्रमाणेच दुष्काळाची स्थिती बुलडाणा जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर १९७२ प्रमाणेच हा दुष्काळ असल्याचे आपणास वाटत आहे. अन्न धान्यासोबतच पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष्य भासणार आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यानुषंगाने पूर्व तयारी ठेवावी, असे ते म्हणाले. चारा व पाण्याच्या नियोजनालाही महत्त्व दिले जावे, असेही त्यांनी शेवटी अधोरेखीत केले. बुलडाणा जिल्ह्यात केलेल्या पाहणीदरम्यान आपले निरीक्षण काय? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी उपरोक्त बाब अधोरेखीत केली.