गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाची प्रशासनाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 05:57 PM2018-09-04T17:57:37+5:302018-09-04T17:58:10+5:30
बुुलडाणा : आगामी गणेशोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने पोलिस व महसूल प्रशासनाच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी शहरातील मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळाची पाहणी करण्यात आली.
बुुलडाणा : आगामी गणेशोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने पोलिस व महसूल प्रशासनाच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी शहरातील मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळाची पाहणी करण्यात आली. तसेच शहरातील गणेश मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी लाडक्या गणरायाची स्थापना करण्यात येते. गणेशोत्सवादरम्यान सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. दहा दिवस मनोभावे आराधना केल्यानंतर बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला जातो. गुलालाची उधळण करीत संगिताच्या तालावर विसर्जन मिरवणूकीत भक्तगण तल्लीन होऊन जातात. भाविकांना विसर्जन मिरवणूकीत कुठलीच अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पोलिस व महसुल विभागाच्या वतीने मंगळवारी सकाळी मिरवणूक मार्गाची व विसर्जन स्थळ सरकारी तलावाची पाहणी करण्यात आली. विसर्जन स्थळाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने व मिरवणूक मार्गाच्या डागडूजीसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी, तहसीलदार सुरेश बगळे, ठाणेदार यु. के. जाधव यांच्यासह नगर पालिका, महावितरण, टेलीफोन व इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने शहर पोलिस स्टेशनमध्ये गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. अप्पर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)