मराठी राजभाषा दिन: भाषा विषयात अमरावती विभागच नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:27 PM2019-02-27T13:27:16+5:302019-02-27T13:28:01+5:30
राज्याच्या तुलनेत अमरावती विभाग भाषा विषयात नापास असल्याचे दिसून आले. तर अमरावती विभागातील तिसरी ते पाचविच्या ५६ टक्के मुलांना पहिलीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन सर्वत्र साजरा केला जातो. या पृष्टभूमीवर विद्यार्थ्यांमधील भाषा विषयाची प्रगती जाणून घेतली असता राज्याच्या तुलनेत अमरावती विभाग भाषा विषयात नापास असल्याचे दिसून आले. तर अमरावती विभागातील तिसरी ते पाचविच्या ५६ टक्के मुलांना पहिलीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कॉन्व्हेंट, सीबीएसई पॅटर्नची संस्कृती रुजली आहे. मात्र या इंग्रजी शाळांपुढे अनेक मुल आपल्या मायबोलीला विसरत असल्याचे चित्र आज पहावयास मिळत आहे. अनेक मुलांना मराठीतील आकडे कळत नाहीत किंवा मराठी पुस्तकाचे वाचन करता येत नसल्याची गंभीर स्थिती आहे. विद्यार्थ्यांचे मुलभूत वाचन आणि गणित या दोन क्षेत्रांतल्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्याचे काम ‘असर’कडून केल्या जाते. मराठी व गणित विषयातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे अनेक धक्कादायक वास्तव ‘असर’च्या अहवालातून समोर आले आहेत. २०१८ च्या शैक्षणिक सत्रामध्ये शहरी व ग्रामीण भागातील काही शाळांची निवड करून त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन आणि गणित या दोन क्षेत्रांतल्या कामगिरीचे विश्लेषण केलेली माहिती या अहवालातून समोर आली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील ७० ते ८० शाळांची निवड करण्यात आली होती. या शाळांमधील विद्यार्थ्यांची वाचन क्षमता व गणित या विषयाचे मुल्यांकन करण्यात आले. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या मुलांना पहिलीचे पुस्तक वाचायला लावले असता अमरावती विभागातून अवघ्या ४४ टक्के मुलांनाच वाचन करता आले. यामध्ये राज्यात एकूण ५५.५ टक्के मुलांचा समावेश आहे. तर नागपूर विभाग ५३.८ टक्के, नाशिक ५४ टक्के, कोकण ६०.८ टक्के, औरंगाबाद ४८.७ टक्के, पुणे विभागात ७१.७ टक्के मुलांना वाचता येते. राज्यात वाचू न शकणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण ४५.५ टक्के आहे. वाचनामध्ये राज्याच्या तुलनेत अमरावती विभागच सर्वात खाली असल्याचे दिसून आले. ‘असर’च्या या माहितीमुळे भाषा विषयांची गंभीर परिस्थिती अमरावती विभागात आहे.
बॉक्स.....
राज्यातील सहावी ते आठवीच्या २३ टक्के मुलांना वाचता येईना!
राज्यात इयत्ता तिसरी ते पाचवी प्रमाणे सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही इयत्ता दुसरीचे पुस्तक वाचनास दिले. यामध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वाचनाचे मुल्यांकन केले असता राज्यातील २३ टक्के मुलांना दुसरीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे दिसून आले. त्यात विद्येचे माहेरघर समजल्या जाणाºया पुणे विभागात १४ टक्के मुले वाचू शकत नसल्याचे आढळून आले. तर वाचन करता येत असलेल्या मुलांची टक्केवारी पुणे विभागात ८६, नागपूर ७५.२, नाशिक ७५, औरंगाबाद ७३.९, अमरावती ७२.६, कोकण विभागात ८१.७ टक्के मुलांना वाचन करता आले.
विद्यार्थ्यांच्या संपादणूक चाचणीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील ठरावीक शाळा निवडण्यात आल्या होत्या. या चाचणीमध्ये तिसरी ते पाचवीच्या मुलांना पाहिलीचे व सहावी ते आठवीच्या मुलांना दुसरीचे पुस्तक वाचनास दिले. अमरावती विभागात तिसरी ते पाचवीचे ४१ टक्के व सहावी ते आठवीचे ७२.६ टक्के विद्यार्थी वाचू शकल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात ‘असर’ने नुकताच अहवाल दिला आहे.
- डॉ. रविंद्र आंबेकर,
प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती.