रेशनचे धान्य कमी मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न, स्टॅम्प पेपरवरच 'सुसाईड नोट'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 07:04 PM2018-10-21T19:04:13+5:302018-10-21T19:06:09+5:30
खामगाव: रेशनचे धान्य कमी मिळत असल्याने त्रस्त झालेल्या एका लाभार्थ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना ...
खामगाव: रेशनचे धान्य कमी मिळत असल्याने त्रस्त झालेल्या एका लाभार्थ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथे शनिवारी सायंकाळी घडली. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या इसमाने शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेपरवरच सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये रेशन दुकानदारासह तिघांच्या छळाचा उल्लेख केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
आधार कार्ड लिंक नसल्यामुळे रेशन धान्य दुकानदाराने धान्य नाकारले. परिणामी, मोताळा तालुक्यात भूकबळी गेल्याचा धक्कादायक प्रकार गेल्याच महिन्यात उघडकीस आला. मेहकर तालुक्यातील एका निराधार आणि वृद्ध महिलेला धान्य नाकारण्यात आल्याचा प्रकार ताजा असतानाच, शनिवारी रेशनचे धान्य कमी मिळत असल्याची तक्रार संबंधित व्यक्तीने केली होती. त्यामुळे, रेशन दुकानदारासह तिघांनी जिवे मारण्याची धमकी दिली. या तिघांचा छळ असह्य झाल्याने खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथील पांडुरंग शंकर रेवस्कर (40) या लाभार्थ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तत्पूर्वी रेशन दुकानदार हसनराव चव्हाण, मालवाटप करणारा विलास खरपकार आणि सहकारी संघरक्षक शंकर ठोसरे यांच्याकडून छळ होत असल्याने, आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे रेवस्कर यांनी लिहून ठेवले आहे. दरम्यान, हा प्रकार उजेडात आल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार हसनराव चव्हाण यांनी रविवारी व्हॉटसअपवरून सामाजिक बदमानी केल्याची तक्रार खामगाव ग्रामीण पोलिसात दिली. यात पांडुरंग रेवसकर गुंड प्रवृत्तीचे असल्याचा उल्लेख करून त्यांचा आत्महत्येचा प्रयत्न बनाव असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी स्वस्त धान्य दुकानदार हसनराव देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होवू शकले नाहीत. तथापि, चव्हाण यांची तक्रार म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असल्याचे रेवस्कर यांच्या नातेवाईकाने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले
व्हॉटसअपवर आत्महत्येचा संदेश!
रेशन धान्य दुकानदार चव्हाण, विलास खरपकार, संघरक्षक ठोसरे या तिघांच्या छळामुळे आत्महत्या करीत असल्याचा संदेश व्हॉटसअपवर व्हायरल केला. त्यानंतर सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान पांडुरंग रेवस्कर यांनी गावातील स्मशानभूमी नजीक असलेल्या एका शेतात विषारी द्रव्य प्राशन केले. तत्पूर्वी काही जणांना फोनवरूनही माहिती दिली. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेऊन रात्री 11 वाजताच्या सुमारास उपचारार्थ अकोला येथील सामान्य रुग्णालयात भरती केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.
रेवस्कर यांच्या नातेवाईकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार!
रेशन दुकानदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रेवस्कर यांच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे रजिस्टर तक्रार केल्याचे समजते. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी रेवस्कर यांनी लिहून ठेवलेला शंभर रूपयांचा स्टॅम्पपेपरदेखील जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे रजिस्टर करण्यात आल्याची माहिती आहे.
यासंदर्भात अद्यापपर्यंत आपणाकडे तक्रार प्राप्त नाही. मात्र, शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर धान्य कमी मिळाले. तसेच तिघांच्या छळामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार आपल्या कानावर आला आहे. तक्रार प्राप्त होताच, तहसीलदारांना पत्र दिले जाईल. संपूर्ण चौकशीअंती पुढील कारवाई केली जाईल.
- रफीक शेख
पोलिस निरिक्षक, खामगाव-ग्रामीण.