मोताळा तालुक्यातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात आणखी दोन आरोपी अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:08 PM2017-12-21T15:08:08+5:302017-12-21T15:13:39+5:30
बुलडाणा : जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर येथे एका विवाहीत महिलेचा वैद्यकीय अहर्ता नसतानाही गर्भपात केल्या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री आणखी दोन जणांना अटक केली आहे.
बुलडाणा : जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर येथे एका विवाहीत महिलेचा वैद्यकीय अहर्ता नसतानाही गर्भपात केल्या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री आणखी दोन जणांना अटक केली आहे. प्रकरणात अहर्ता नसलेला एक आणि बुलडाणा येथील डॉक्टरला बुधवारी सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दुसरीकडे या प्रकरणाचे धागेदोरे गुजरात राज्याशी जुळलेले असण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी व्यक्त केली.
वैद्यकीय अहर्ता नसलेल्या ब्रिजलाल सुपडा चव्हाण (५०, रा. गुळभेली) आणि डॉ. सय्यद आबिद हुसैन सय्यद नजीर (४९, रा. बुलडाणा) या दोन आरोपींना या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले होते. दरम्यान, गर्भपात करणारी महिला आणि तिचा पती या दोघांनाही पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतले असून दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. मोताळा तालुक्यातील एका महिलेचे परराज्यात गर्भलिंग निदान करण्यात आले होते. त्यानंतर संबंधीत महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या गर्भपातासाठी मोताळा तालुक्यातील ब्रिजलाल सुपडा चव्हाण याच्याशी संपर्क केला होता. राजूर येथे संबंधित महिलेचा बेकायदेशीर गर्भपात त्याने केला. मात्र महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला बुलडाणा येथील डॉ. सय्यद आबिद हुसैन याच्याकडे नेण्यात आले. तेथे त्याने महिलेवर उपचाराचा प्रयत्न केला. परंतू महिलेची प्रकृती नाजूक झाल्याने तिला अकोला येथील खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची माहिती बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयास देण्यात आल्यानंतर प्रकरणात मोताळा येथील वैद्यकीय अधिकाºयांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात आता आणखी दोन आरोपींची भर पडली असून प्रसंगी पोलिसांचे पथक गुजरातमध्ये प्रकरणाच्या तपासासाठी जाणार असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. बुधवारी अटक करण्यात आलेल्या उपरोक्त दोन्ही आरोपींना न्यायालयाने २६ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.