‘तू मेरी नही...तो किसीकी नही’! : तरुणीच्या हत्येला प्रेमप्रकरणाची किनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 01:10 PM2019-05-18T13:10:37+5:302019-05-18T14:28:05+5:30
खामगाव : स्थानिक संजिवनी कॉलनीतील श्रीमती मीनाताई जाधव आयटीआय परीक्षा केंद्रानजीक शनिवारी घडलेल्या हत्याकांडाला प्रेमप्रकरणाची किनार असल्याचा दावा पोलिस सुत्रांचा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक संजिवनी कॉलनीतील श्रीमती मीनाताई जाधव आयटीआय परीक्षा केंद्रानजीक शनिवारी घडलेल्या हत्याकांडाला प्रेमप्रकरणाची किनार असल्याचा दावा पोलिस सुत्रांचा आहे. एका निष्पाप युवतीला जीव गमवावा लागल्याने समाजमन सुन्न झाल्याचे दिसून येते.
खामगाव शहरातील सनी पॅलेस जवळील सुधीर निंबोकार यांची मुलगी कु. अश्विनी हिच्याशी अकोला जिल्ह्यातील पातूर येथील सागर निंबोळे या युवकाशी गत पाच वर्षांपासून पे्रमसंबंध होते. सागर हा अश्विनीचा वर्ग मित्र असल्याने दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. दरम्यान, याच जवळकीतून सागर निंबोळे याने अश्विनीच्या वडीलांकडे अश्विनीसोबत लग्नाची मागणी केली होती. एकाच समाजातील असल्याने अश्विनीच्या नातेवाईकांकडून सागरच्या संबंधाला फारसा विरोध करण्यात आला नाही. मात्र, विवाहाच्या बोलणी दरम्यान, सागरच्या कुटुंबातील अवास्तव अपेक्षेमुळे अश्विनीच्या कुटुंबियांकडून हा संबंध नाकारण्यात आला. तेव्हापासूनच सागर जीवे मारण्याच्या धमक्या देत अश्विनीचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, अश्विनी त्याला कोणताही प्रतिसाद देत नसल्याने व्यवसायाने खासगी शाळेत शिक्षक असलेल्या सागर निंबोकार यांने अतिशय निर्दयीपणे अश्विनीची हत्या केली. या प्रकारामुळे खामगाव येथील निंबोकार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, वडिलांना मदत व्हावी यासाठी काही काळ अश्विनीने शहरातील एका खासगी शिक्षण संस्थेत शिक्षिकेची नोकरीही मिळविली होती. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या अश्विनीची निर्घुन हत्या झाल्याने तिच्या मैत्रिणींनाही धक्का बसला आहे. शुक्रवारी रात्री अश्विनीवर अतिशय शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
निर्जनस्थळ बनले धोकादायक!
खामगाव शहरातील निर्जन स्थळ गत काही दिवसांमध्ये धोकादायक बनल्याचे दिसून येते. १५ दिवसांपूर्वीच स्थानिक नगर पालिका मैदानावर विक्की हिवराळे या युवकाची भोसकून हत्येचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर काही दिवसातच संजिवनी कॉलनीतील मीनाताई जाधव आयटीआय नजीक अश्विनीच्या हत्येचा प्रकार समोर आला. अश्विनीची हत्या झाली. त्यावेळी तिने आरडाओरडा केला. तसेच जीव वाचविण्यासाठी आटापीटाही केला. त्यामुळे निर्जनस्थळी असलेल्या ठिकाणाऐवजी दुसरीकडे कदाचि हा प्रकार घडल्यास अश्विनीचे प्राण वाचू शकले असते? अशी चर्चा समाजमनात उमटत आहे. त्याचवेळी निर्जनस्थळी असलेल्या परीक्षाकेंद्राच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
मृतक अश्विनी आणि सागर निंबोळे यांच्या गत पाच वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर येत आहे. मुलाकडील मंडळीच्या अवास्तव मागणीमुळे अश्विनीच्या कुटुंबियांनी विवाह संबंधास नकार दिला होता. त्यामुळे चिडलेल्या सागर निंबोळे यानेच अश्विनीची हत्या केली असल्याचे तपासाअंती स्पष्ट होत आहे.
- प्रदीप पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, खामगाव