आरटीई अंतर्गत ७२ हजार बालकांना मोफत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:33 PM2018-08-07T12:33:29+5:302018-08-07T12:33:49+5:30
आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१८- २०१९ या सत्रासाठी तिसऱ्या फेरीमध्ये राज्यातील आठ हजार ९७६ शाळांमध्ये ७२ हजार ८७३ बालकांना मोफत प्रवेश मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परिमल डोहणे
चंद्रपूर : आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१८- २०१९ या सत्रासाठी तिसऱ्या फेरीमध्ये राज्यातील आठ हजार ९७६ शाळांमध्ये ७२ हजार ८७३ बालकांना मोफत प्रवेश मिळाला आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या सोडतीनंतरही राज्यात तब्बल ५३ हजार २३६ जागा रिक्त आहेत.
आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्चशिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ ला शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती केली. या कायद्यानुसार नामांकित शाळांमध्ये २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती़ यानुसार राज्यभरात आठ हजार ९७६ शाळांची यादी शासनाने जाहीर केली़ २५ टक्के कोट्यानुसार एक लाख २६ हजार १०९ बालकांना मोफत प्रवेश द्यायचा होता. या जागांसाठी महाराष्ट्रातून एक लाख ९९ हजार ११ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर केले. त्यापैकी पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या सोडतीमध्ये एक लाख ११ हजार ७८ बालकांची निवड करण्यात आली. त्यापैकी केवळ ७२ हजार ८७३ बालकांंनी संबंधित शाळांमध्ये प्रवेश निश्चित केला. तिसरी सोडत जाहीर झाल्यानंतरही राज्यभरात ५३ हजार २३६ जांगा रिक्त आहेत. त्यासाठी येत्या काही दिवसांत सोडत काढण्याचा निर्णय विचाराधीन असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेश
पुणे येथे ९३० शाळांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार १६ हजार २९१ जागा निर्धारित करण्यात आल्या होत्या. यासाठी ४३ हजार ५८३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ११ हजार ८३० जणांचा प्रवेश निश्चित झाला आहे. तर नागपूरमध्ये पाच हजार ७४१, ठाणे पाच हजार ६८४, नाशिक चार हजार ६०९, औरंगाबाद तीन हजार ६०७, अहमदनगर तीन हजार १८२, अमरावती दोन हजार ४६० तर बुलढाणा जिल्ह्यात दोन हजार १७० बालकांचा प्रवेश निश्चित झाला आहे.