पालकांना आनंदाची बातमी; खासगी शाळेच्या गणवेशात नाही बदल, भावही स्थिर
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 16, 2024 11:06 AM2024-05-16T11:06:30+5:302024-05-16T11:10:01+5:30
खासगी शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून गणवेश सक्तीचा केला जातो.
छत्रपती संभाजीनगर : खासगी शाळांनी यंदा विद्यार्थ्यांच्या गणवेशात बदल केला नाही. एवढेच नव्हे, तर गणवेशाच्या किमतीही मागील वर्षीप्रमाणेच स्थिर ठेवल्या आहेत. यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी पालकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
खासगी शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून गणवेश सक्तीचा केला जातो. गणवेश वितरक रोमी छाबडा यांनी सांगितले की, खासगी शाळांनी यंदा गणवेशात बदल केला नाही. मागील वर्षाप्रमाणेच यंदा भाव स्थिर आहेत. कोरोना काळानंतर शालेय शाळा सुरू झाल्या तेव्हा नवीन गणवेशांचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, आता तशी परिस्थिती नाही. यामुळे स्टेट बोर्ड, सीबीएसई पॅटर्नच्या खासगी शाळांमधील गणवेश यंदा वेळेआधी उपलब्ध होतील. गणवेश मुबलक प्रमाणात असून, कोणताही तुटवडा जाणवणार नाही.
कुठे शिवले जातात शालेय गणवेश
शहरातील मराठी, सेमी इंग्लिश, इंग्लिश खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे ३०पेक्षा अधिक लहान-मोठे वितरक आहेत. सोलापूर, पुणे येथील युनिटमधून शालेय गणवेश शिवून घेतला जातो. तसेच कर्नाटक राज्यातील बिल्लोरी येथेही आता गणवेशाची शिलाई होत असून, तिथे फुल पँट व हाफ पँट शिवली जात आहे.
खासगी शाळा इंग्रजी माध्यम गणवेशाचे सर्वसाधारण दर शालेय गणवेश
इयत्ता दर
इयत्ता ५ वी ते ७ वी ७००-८५० रु. इयत्ता ८ वी ते १० वी ८००- ८५० रु. --------
खेळाचा गणवेश
इयत्ता ५ वी ते ७ वी ६००- ७५० रु. इयत्ता ८ वी ते १० वी ७५०-८०० रु. ----------------
मुलींचे जॅकेट -३५०-७०० रु. मुलांचे ब्लेझर - ९००- १५०० रु. ----------- मुुलींचे स्कर्ट ४५०-६५० रु.
चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस
नर्सरी, केजीतील विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश, पण रंगीत आले आहेत. यात रंगीत टी-शर्ट व जीन्सच्या हाफ पँटचा समावेश असतो. ५०० ते ६०० रुपयांत हा गणवेश मिळतो.
४० टक्के विद्यार्थी घेतात नवीन गणवेश
गणवेशात कोणताही बदल नसल्याने ४० टक्के विद्यार्थी नवीन गणवेश खरेदी करतात. बाकी कोणाचा शर्ट तर कोणाची पँट खराब झाला असेल तर तेवढचे खरेदी करतात. शहरात दीड लाख विद्यार्थी आहेत. गणवेश विक्रीत सुमारे १५ ते २० कोटींची उलाढाल होते, अशी माहिती गणवेश वितरकांनी दिली.