अकोला येथील 'आप' नेते मुकीम अहेमद व शफी कादरी यांची हत्या; बुलडाणा जिल्ह्यात सापडले मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 04:15 PM2018-08-04T16:15:09+5:302018-08-04T16:23:33+5:30
बुलडाणा : अकोला येथील आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहेमद व बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील शफी कादरी या दोघांची कथितस्तरावरील व्यावसायिक स्पर्धेतून अकोला शहरात ३० जुलै रोजी हत्याकरून त्यांचे मृतदेह हे बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा लगतच्या पाथर्डी घाट परिसरात फेकून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बुलडाणा : अकोला येथील आम आदमी पक्षाचे नेते मुकीम अहेमद व बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील शफी कादरी या दोघांची कथितस्तरावरील व्यावसायिक स्पर्धेतून अकोला शहरात ३० जुलै रोजी हत्याकरून त्यांचे मृतदेह हे बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा लगतच्या पाथर्डी घाट परिसरात फेकून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात अकोला पोलिसांनी आतापर्यंत पाच ते सात जणांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रकणात अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गेल्या दोन दिवसापासून मेहकर, जानेफळ, साखरखेर्डा परिसरात दोघांचा शोध घेत होते. प्रकरणात दोन आॅगस्ट रोजी शहनाज यांच्या तक्रारीवरून अकोला खदान पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभिर्य पाहता अकोल्याचे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सहा अधिकार्याचे एक पथक तपासासाठी गठीत केले होते. प्रकरणात पोलिसांनी दोन संशयीतांना यापूर्वी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारावर अकोल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी माने, पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण व त्यांची चमू दोन दिवसापासून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा तालुक्याच्या पट्ट्यात या प्रकरणाचा तपास करीत होती. दरम्यान, अकोला पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या सांगण्यानुसार अकोला पोलिस तपास करीत देऊळगाव साकर्शा नजीकच्या पाथर्डी घाटात मुकीम अहेमद व शफी कादरी यांचे मृतदेह शोधण्यासाठी पोहोचली आहे. चार ऑगस्ट रोजी दुपारी या दोघांचे मृतदेह या जंगल भागात सापडल्याची माहिती मिळत आहे. दोघांचेही मृतदेह हे डीकंपोज झाले असल्याने घटनास्थळीच त्यांच्या पार्थिवाचे डॉक्टरांकडून शवविच्छेदन करण्यात येण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी व्यक्त केली आहे.
गळा आवळून खून केल्याची शक्यता
मुकीम अहेमद व शफी कादरी यांना अकोला येथे जेवणास बोलावून तेथे ३० जुलै रोजी त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती अकोला पोलिस दलातील सुत्र देत आहेत. या प्रकरणात जवळपास १५ आरोपी असण्याची शक्यता असून वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाकद परिसरातील तीन, बुलडाणा जिल्ह्यातील सहा ते सात आणि अकोला जिल्ह्यातील चार आरोपींचा यात समावेश असल्याचे पोलिस सुत्राचे म्हणणे आहे. प्रकरणात पोलिसांनी प्रारंभी मुकीम अहेमद यांच्या पत्नी शहनाज यांच्या तक्रारीवरून तसव्वुर खान कादरी, कौसर शेख, शेख चांद, अजीम, शेख कलंदर, शेख मुजफ्पर आणि शेख अकिल यांच्यासह अन्य काही जणावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
संवेदनशील प्रकरणाचा लगोलग छडा
अकोला व बुलडाणा जिल्ह्याच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या प्रकरणात अकोल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी सहा अधिकार्यांची तपासासाठी नियुक्ती करून प्रकरणाचा मोठ्या शिताफीने तपास लावला. दरम्यान, या प्रकरणात अकोल्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन प्रकरणाचा गांभिर्याने तपास करण्याची मागणी केली होती. यामध्ये शिवसेनेचे विधायक गोपीकिशन बाजोरिया, माजी मंत्री अजहर हुसैन, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव चौधरी, मनपाचे विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, स्थायी समितीचे माजी सभापती रफीक सिद्दीकी, सय्यद युसूफ अली, हुरना अफरोज, इरफान खान, मुफ्ती अशफाक, जावेद जकारिया यांचा समोश होता. अल्पावधीत या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे.