शाळांची वेळ बदलणार; पालक, रिक्षा चालकांची अडचण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 05:16 PM2024-05-14T17:16:18+5:302024-05-14T17:16:40+5:30
वेळ बदलण्यास पालकांचाही विरोध : दोन सत्रांचे नियोजन कसे करावे?
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येत्या शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच भरविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, शाळेची वेळ बदलल्याने दोन सत्रांत चालविल्या जाणाऱ्या शाळा, नोकरदार पालक व रिक्षा चालकांना अडचणीचे ठरणार आहे. तसेच शाळांनाही दोन सत्रांचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा आता शिक्षण संस्था चालकांसह पालक, शिक्षकांनी विरोध सुरू केला आहे. हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे.
'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान' उद्घाटनप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी शाळांच्या वेळेबाबत शिक्षण विभागाला सूचना केली होती. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून शाळेच्या वेळा बदलण्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पहिली ते चौथीचे वर्ग सकाळी ९ किंवा त्यानंतर भरविण्याची सूचना शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिली आहे. या सूचनेमुळे आता पुढील वर्षाचे नियोजन करताना शाळांना दोन सत्रांत शाळा भरवून, आधीच्या वेळांची अदलाबदल करावी लागणार आहे.
घराच्या एक किमीच्या परिसरात शाळा असेल, तर तेथेच मुलांना शाळा प्रवेश द्यावा. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल व मुलांची पुरेशी झोपही होईल. परंतु, अनेक पालकांची मुले १० ते १२ किलोमीटर अंतरावरील शाळेत जातात. त्यामुळे पालकांची तर ओढाताण होईलच, शिवाय दोन सत्रांमध्ये नियोजन करताना शाळांनाही कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा विचार करावा.
- एस. यू. वंजारी, शिक्षणतज्ज्ञ, गोंदिया.
मुलांची झोप होत नाही. हे खरे असले, तरी शाळेची वेळ बदलल्याने प्रश्न सुटणार नाही. शिक्षण विभागाने यातून मध्य काढावा. शाळेची आणि नोकरीची वेळ एकच येत असल्याने मुलांना शाळेत कसे पोहोचवावे? स्कूल बस, ऑटो लावल्यानंतरही तयारीचा प्रश्न कायम राहतो.
- ममता शिवणकर, पालक
प्रत्येक शाळेची वेळ वेगवेगळी आहे. काही शाळांमध्ये एक्स्ट्रा तासही घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहोचविणे शक्य होणार नाही. आम्हालाही विद्यार्थ्यांच्या शाळेत पोहोचताना कसरत करावी लागणार आहे. शिक्षण विभागाने याचा विचार करून पूर्वीप्रमाणे शाळांची वेळ कायम ठेवावी.
- गोपाल हरिणखेडे, स्कूल बसचालक
आमची शाळा दोन शिफ्टमध्ये चालते. सकाळी ९ वाजताची वेळ केल्यास दुपारची शाळा केव्हा भरवायची? सकाळी ९ वाजताची शाळा सुरू करण्यास पालक व विद्यार्थ्यांचीही मानसिकता नाही. अनेक शाळा दोन सत्रांत चालतात. त्यामुळे शिक्षण विभागाने ९ वाजताची शाळा करण्याच्या निर्णयावर विचार करावा.
- दिनेश राऊत, प्राचार्य, आदर्श विद्यालय आमगाव.
प्राथमिक व उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षा चालकांना मोठी अडचण होणार आहे. अनेक कुटुंबांतील आई-वडील दोघेही नोकरी करतात. अशा नोकरदारांसमोर शाळेची वेळ व कामावर जाण्याची वेळ एकच येत असल्याने त्यांना मुलांना शाळेत पोहोचवताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तसेच शाळाही दोन सत्रांत भरविणे व त्याप्रमाणे नियोजन करणे कठीण होणार आहे.
- मिलिंद रंगारी, शिक्षणतज्ज्ञ, गोंदिया.