जळगाव जिल्ह्यात लोकसहभागातून 1551 जि.प. शाळा ‘डिजिटल’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 11:30 AM2018-11-04T11:30:40+5:302018-11-04T11:31:07+5:30
जळगाव जिल्ह्यातील १ हजार ५५१ जिल्हा परिषद शाळांनी लोकसहभागातून तब्बल १ कोटी ११ लाख ८० हजार रुपयांचा निधी उभारला आहे.
सागर दुबे
जळगाव : जिल्ह्यातील १ हजार ५५१ जिल्हा परिषद शाळांनी लोकसहभागातून तब्बल १ कोटी ११ लाख ८० हजार रुपयांचा निधी उभारला आहे. या निधीतून या शाळाडिजिटल करण्यात आल्या आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे. ही गळती थांबविण्याचे आव्हान जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांनी स्वीकारले असून लोकसहभागाच्या माध्यमातून शाळांना अत्याधुनिक करण्याचे प्रयत्न सुरू झाले. शिक्षकांनी सुरुवातीला स्वत: काही रक्कम जमा केली आणि गावकऱ्यांना आवाहन केले. या आवाहनाला गावक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अन् शाळांचे रूपडे पालटले
लोकसहभागातून जिल्ह्यातील १८३५ शाळांनी तब्बल १ कोटी ११ लाख ८० हजार ७३८ रुपये उभारले़ त्यातून शाळांना संरक्षण भिंत, रंगरंगोटी, संगणक, टीव्ही संच, टॅबलेट, उद्यान, ई-लर्निंगसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा, डिजिटल शाळा, वर्गखोल्या उभारण्याचे काम करण्यात आले आहे. काही ठिकाणी आर्थिक मदत करू न शकणा-या गावक-यांनी श्रमदानातूनही शाळांना मदत केली आहे. त्यामुळे अनेक शाळांचे रूपडे पालटले आहे. शासनाच्या आर्थिक मदतीविना शाळांमध्ये भौतिक सुविधांमध्ये वाढ झाली आहे. शासनावर अवलंबून न राहता या शाळांनी लोकसहभागातून हा उपक्रम राबविल्याने ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
१८३५ पैकी १५५१ शाळा डिजिटल
जळगाव जिल्ह्यात १८३५ प्राथमिक जिल्हा परिषद शाळा आहेत़ त्यापैकी १५५१ शाळा या लोकसहभागातून डिजिटल करण्यात आल्या आहेत़ लवकरच जिल्ह्यातील सर्व शाळा या डिजिटल होणार आहेत़ शाळांमधील सुविधा तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे जिल्ह्यातील ६६ शाळांना आयएसओ मानांकन प्राप्त झालेले आहे़ १८०८ शाळा या मोबाईल डिजिटल शाळा या लोकसहभागाच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या आहेत़ तर ज्ञानरचनावादी पध्दतीने अध्यापन करणा-या १६९४ शाळा आहेत़
तालुकानिहाय डिजिटल शाळांची संख्या
तालुका संख्या
अमळनेर - १३४
भडगाव - ३६
भुसावळ- ६६
बोदवड- २६
चाळीसगाव- १९०
चोपडा- १००
धरणगाव- ९१
एरंडोल- ७६
जळगाव- ८१
जामनेर- १९७
मुक्ताईनगर- ८४
पाचोरा- १२५
पारोळा- १०४
रावेर- १५०
यावल- ९१
एकूण- १५५१