‘सासू’मधली ‘माय’ जागली... सुनेची आयुष्यवात तेजाळली!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 11:13 AM2024-03-29T11:13:34+5:302024-03-29T13:20:12+5:30

सासूची किडनी सुनेला, प्रत्योरापण शस्त्रक्रिया यशस्वी

Mother-in-law's kidney transplant to doughtier-in-law, surgery was successful, Jalgoan | ‘सासू’मधली ‘माय’ जागली... सुनेची आयुष्यवात तेजाळली!

‘सासू’मधली ‘माय’ जागली... सुनेची आयुष्यवात तेजाळली!

जळगाव : घराघरात भांडी वाजतात. सासू-सुनेचे खटकेही उडतात. इथल्या रावळाने मात्र सौख्याची चूल पेटविली आहे. तीही आदर्श पेरण्यासाठी. सुनेमध्येच ‘लेक’ दडून असल्याची जाणीव करून देण्यासाठी. म्हणून तर आयुष्यकोंडीतून सुनेला बाहेर काढण्यासाठी सासू सरसावली आणि तिने सुनेमध्ये असणाऱ्या लेकमायेला जागविले, तेही किडनीदानातून...!

पारोळ्यातील दीपाली सागर पाटील. २०१३ पासूनच तिच्या नशिबाने थट्टा करायला सुरुवात केली. २०१८ मध्ये मूत्रपिंडांची तपासणी केली आणि उपचाराची दिशा निश्चित झाली. तशातच कोरोनाची लाट आली. कोरोनाग्रस्त दीपालीला भयंकर औषधांनी हेरले आणि तिची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली.  दीपालीसाठी तिची आई सरसावली मात्र मधुमेहामुळे त्यांचे मूत्रपिंड जुळले नाही. सारं संपलं असं वाटत असताना सासू नावाची एक ‘माय’ उरली होती. 

दीपालीला ममत्वाची श्रीमंती : जन्मदाती माय आणि सासूच्या रूपाने गवसलेली ममत्वाच्या दुधावरची साय. माहेरच्या उंबरठ्यातून पाझरणारे ‘ममत्व’पण दीपालीला सासरीही लाभले. म्हणून तिचाही चेहरा ममत्वाच्या श्रीमंतीने सुखावला होता. तिकडे सागरही आईच्या दातृत्वापुढे झुकला होता. नातू गिरीशही माय सुखरूप आहे, हे ऐकून आनंदला होता.

सासूबाई सरसावल्या
दीपालीत दिसणारी ‘लेक’ सुखरूप घरी परतावी म्हणून सासू मालतीबाई क्षणात सरसावल्या. चाचण्यांचे सोपस्कार आटोपले. सासूतल्या ‘माय’पणाने नियतीलाही परतवून लावले. मालतीबाईंची किडनी जुळली. पुण्यातली वैद्यकीय यंत्रणा सरसावली. २७ रोजी किडनीचे प्रत्यारोपण यशस्वीपणे झाले. तेव्हा दीपालीला मालतीबाईंच्या नजरेत भरलेलं ‘माय’पण खुणावत गेलं. 

Web Title: Mother-in-law's kidney transplant to doughtier-in-law, surgery was successful, Jalgoan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव