महागाईचा ‘प्रवास’ सुसाट डिझेल दरवाढ : मालवाहतुकीचे टनाचे दर वाढले; जीवनावश्यक वस्तू महागल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:34 AM2018-09-05T00:34:54+5:302018-09-05T00:35:50+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विनिमय दरामुळे भारतीय बाजारात पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. दि. १ ते ३१ आॅगस्ट या महिन्याच्या कालावधीत डिझेलचा दर ३.५४ पैशांनी महागला आहे. डिझेलवरच मालवाहतुकीचा
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विनिमय दरामुळे भारतीय बाजारात पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. दि. १ ते ३१ आॅगस्ट या महिन्याच्या कालावधीत डिझेलचा दर ३.५४ पैशांनी महागला आहे. डिझेलवरच मालवाहतुकीचा बोजा असल्याने त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंच्या किमती वाढण्यात झाला आहे. मालवाहतुकीसह भाजीपाला, पार्सल, कुरिअर सेवा महागल्या आहेत. एसटी व केएमटीलाही मोठा फटका बसला असून दरात मोठी वाढ करण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.
कोल्हापूर : गेल्या आठ महिन्यांत डिझेलच्या दरामध्ये १२ रुपये १९ पैसे इतकी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस डिझेलचे भाव पेट्रोलच्या भावालगत येत आहेत. मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना इंधन म्हणून डिझेल लागते; त्यामुळे डिझेलच्या प्रतिलिटर भावात वाढ झाली की, आपोआप जीवनावश्यक वस्तूंसह सर्व वस्तूंच्या किमतीत वाढ होते; त्यामुळे डिझेल दरवाढ सर्वसामान्यांच्या मुळावर येते.
दिवसेंदिवस डिझेल दरवाढीमुळे धान्य, कडधान्ये, जीवनावश्यक वस्तू, आदींचे भावही वाढू लागले आहेत. मालवाहतूकदारांनी डिझेल दरवाढीमुळे टनाच्या दरातही वाढ केली. यापूर्वी ९००-१००० रुपये प्रतिटन दराने मुंबई (वाशी)पर्यंत वाहतूक केली जात होती. डिझेल दरवाढीमुळे प्रतिटन आता ११००-१२०० रुपये इतका भाव अटळ आहे, तर पार्सलचे भावही ४ ते ५ टक्क्यांनी वाढले आहेत.
ज्या पार्सलला १०० रुपये मोजावे लागत होते, तर त्याच पार्सलला आता ११० रुपये मोजावे लागत आहेत. कुरिअर सेवेतही काहीअंशी वाढ झाली आहे. विशेषत: कोल्हापुरातून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, आदी ठिकाणी मालवाहतूक केली जाते. यात साखर, कडधान्ये, धान्य, होजिअरी, पानाचे डाग, सजावटीचे साहित्य पाठविले जाते. त्यांच्या भाडेवाढीतही वाढ झाली आहे. मुख्य परिणाम मुंबई, दिल्ली, नोएडा, बंगलोर, आदी ठिकाणाहून कोल्हापूरच्या बाजारात येणाºया मालवाहतुकीवर झाला आहे. त्याचे दर प्रतिटन १२००-१४०० असे लागू करण्यात आले आहेत.
सद्य:स्थितीत कोल्हापुरातून बाहेरगावी जाणाºया साखरेच्या मालवाहतुकीवर साखरेचा दर पडल्याने परिणाम झाला आहे. विशेषत: अहमदाबादकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे. यासह केरळकडे जाणारी मालवाहतूकही ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम मालवाहतुकीवरही झाला आहे.
डिझेल दरवाढीचा एस. टी.ला फटका
कोल्हापूर : डिझेलचे दर सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ७५ रुपयांवर गेल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला महिन्याला सुमारे २० लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडत आहे. तिकीट दरवाढ व डिझेलची दररोज होणारी वाढ यामुळे महामंडळ दुहेरी संकटात सापडले आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एस.टी.चा तोटा भरून काढण्यासाठी, कर्मचाºयांची पगारवाढ आणि इंधन दरवाढीमुळे जूनमध्ये १८ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव लागू केला आहे. त्यामध्येच डिझेलच्या दररोजच्या दरवाढीचा व उत्पन्नाचा ताळमेळ घालताना विभागाची चांगलीच दमछाक होत आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे एस.टी.ला महिन्याला सुमारे २0 लाखांचा अतिरिक्त भार सोसावा लागत आहे.
एसटीचा तिकीट दर ठरवत असताना डिझेलचा दर महत्त्वाचा मानला जातो. ८९२ बसेस विभागात दररोज अडीच लाख किलोमीटर रस्त्यांवरून धावतात.
१३ धावा कमी; ७ षटके बाकी
कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत कोल्हापुरातील पेट्रोलचा दर तब्बल सात रुपये ३० पैसे व डिझेलचा नऊ रुपये ३० पैसे इतका वाढला आहे. मंगळवारी पेट्रोलचा दर ८६ रुपये ८२ पैसे, ७४ रुपये ७३ पैसे इतका होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशांचे बजेट कोलमडले आहे. दरवाढीमुळे भाजप सरकारवर ‘पेट्रोलच्या शतकासाठी १३ धावा कमी; सात षटके बाकी; शतक होणार की नाही?’ अशी टीका सोशल मीडियासह सर्व स्तरांतून होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या बॅरेलचा दर सध्या ७७ डॉलर आहे. एक डॉलर ७१ रुपये असा चलनाचा दर आहे. वाढत्या कच्च्या तेलाचे दर आणि विनिमय दर बदलामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरांत वाढ होत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ३१ आॅगस्टपर्यंत पेट्रोलची मूळ किंमत ५८ रुपये ८९ पैसे, मूल्यवर्धित कराचे (व्हॅट) १४ रुपये ७२ पैसे (२५ टक्के), अधिभार नऊ रुपये, २३ पैसे परवाना शुल्क असे ८२ रुपये ८४ पैसे पेट्रोल व विक्रेता मार्जिन तीन रुपये १६ पैसे असा एकूण ८६ रुपये दर आहे. याचबरोबर डिझेलची मूळ किंमत ५८ रुपये दहा पैसे, १२ रुपये व्हॅट, एक रुपया अधिभार असा ७१ रुपये ४९ पैसे व विक्रेता मार्जिन दोन रुपये तीन पैसे असा एकूण ७३ रुपये ५२ पैसे डिझेलचा दर होता. दरम्यान, १ मार्च २०१८ ला पेट्रोलचा दर ७९ रुपये ५२ पैसे, डिझेल ६५ रुपये ४३ पैसे असा दर होता. आज पेट्रोलचा दर ८६ रुपये ८२ पैसे, डिझेल ७४ रुपये ७३ पैसे इतका झाला आहे.
डिझेलच्या प्रतिलिटर दरात वाढ होऊनही गेल्या दोन महिन्यांपासून आमच्या मालवाहतूकदारांनी दरात वाढ केली नव्हती. डिझेल दरवाढीपूर्वी मालवाहतुकीचे प्रतिटन दर ९००-१००० इतके होते; मात्र, डिझेल दरवाढीनंतर त्यात वाढ करणे अनिवार्य ठरले आहे.- हेमंत डिसले, सचिव, जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशन .
एक देश, एक कर पाहिजे. पेट्रोल व डिझेल यांचा समावेश वस्तू व सेवा कर (जी.एस.टी)मध्ये करावा. जेणेकरून, इंधनाचे दर कमी होतील व याचा फायदा सर्वसामान्यांना होईल.
- गजकुमार माणगांवे, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल-डिझेल असो.
तीन दिवसांतील दर
१ सप्टेंबर
पेट्रोल ८६ रुपये १७ पैसे (१७ पैसे वाढ) डिझेल ७३ रुपये ७५ पैसे (२३ पैसे वाढ )
२ सप्टेंबर
पेट्रोल ८६ रुपये ३४ पैसे ( १७ पैसे वाढ) ४डिझेल ७४ रुपये १२ पैसे (३७ पैसे वाढ).
३ सप्टेंबर
पेट्रोल ८६ रुपये ६६ पैसे, (३२ पैसे वाढ) ४डिझेल ७४ रुपये ५३ पैसे (४१ पैसे वाढ).