कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडणूक उद्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 03:09 PM2018-05-03T15:09:57+5:302018-05-03T15:09:57+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या चार प्रभाग समिती सभापतींची निवडणूक उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता होणार असून बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत प्रत्येक समिती सभापतिपदासाठी प्रत्येकी दोघांनी उमेदवारी अर्ज भरले आहे. त्यामुळे ‘एकास एक’ अशी लढत होणार असली तरी ताराराणी मार्केट प्रभाग समितीवर १०-१० असे समान संख्याबळ असल्याने सभापतिपदाचा निर्णय हा चिठ्ठी टाकून होणार आहे.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या चार प्रभाग समिती सभापतींची निवडणूक उद्या, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता होणार असून बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीत प्रत्येक समिती सभापतिपदासाठी प्रत्येकी दोघांनी उमेदवारी अर्ज भरले आहे. त्यामुळे ‘एकास एक’ अशी लढत होणार असली तरी ताराराणी मार्केट प्रभाग समितीवर १०-१० असे समान संख्याबळ असल्याने सभापतिपदाचा निर्णय हा चिठ्ठी टाकून होणार आहे.
बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत प्रत्येक प्रभाग सभापतिसाठी दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गांधी मैदान, शिवाजी मार्केट, बागल मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत प्रभाग समितींवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने तेथे आघाडीचे उमेदवार सहज विजय होऊ शकतात; परंतु ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत प्रभाग समितीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे दहा तर भाजप-ताराराणी आघाडीचे दहा असे समान सदस्य संख्याबळ असल्याने तेथे चिठ्ठी टाकून निर्णय घेतला जाणार आहे.
यापूर्वी दोनवेळा ताराराणी मार्केट प्रभाग समिती सभापतिपदाची अशीच चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी ताराराणी आघाडीचे राजसिंह शेळके विजयी ठरले होते. त्यामुळे यावेळी काय होते याबाबत उत्सुकता आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होत आहे.
उमेदवारी अर्ज भरलेल्यांची नावे -
१. गांधी मैदान प्रभाग समिती - ललिता ऊर्फ अश्विनी बारामते (भाजप), प्रतीक्षा धीरज पाटील (काँग्रेस)
२. शिवाजी मार्केट प्रभाग समिती - सुनंदा सुनील मोहिते (भाजप), माधवी प्रकाश गवंडी (राष्टÑवादी)
३. बागल मार्केट प्रभाग समिती - कमलाकर यशवंत भोपळे (भाजप), शोभा धनाजी कवाळे (काँग्रेस)
४. राजसिंह भगवान शेळके (ताराराणी), माधुरी संजय लाड ( कॉँग्रेस)