कोल्हापूर : सिनेमातील वाईट गोष्टींचे अंधानुकरण करु नका : अजय कुरणे, बाल स्नेहसंमेलनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 07:19 PM2017-12-20T19:19:12+5:302017-12-20T19:29:38+5:30
कोल्हापूर : सिनेमातील वाईट गोष्टींचे अंधानुकरण करू नका, असे आवाहन करत प्रसिद्ध सिने दिग्दर्शक अजय कुरणे यांनी तुम्ही जेंव्हा आवडणारी गोष्ट मनापासून करता तेंव्हा तीच कृती तुम्हाला आयुष्यात मोठं बनविते, असे अनुभवाचे बोल विद्यार्थ्यांना ऐकवले. येथील शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये सुरू असलेल्या बाल स्नेहसंमेलनात बुधवारी लघुपटाविषयीच्या सत्रात ते बोलत होते.
कोल्हापुरातील शिवाजी मराठा हायस्कूल येथील बालस्नेहसंमेलनात दिग्दर्शक अजय कुरणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
येथील शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूलच्या स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय बाल स्नेहसंमेलनाची सांगता बुधवारी झाली.
पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी यावेळी डु फ्लॉवर फ्लाय, कॅमेरा, द किड या लघुपटांचा आस्वाद घेतला. यावेळी कुरणे यांनी विद्यार्थ्यांशी मुलांच्या भावविश्वाशी निगडित लघुपट आणि चित्रपट निर्मितीसंदर्भात संवाद साधला. ते म्हणाले, सिनेमातील कथा, अभिनय म्हणजे सिनेमा नव्हे, त्याची निर्मिती लक्षात घ्या, त्यामागील कष्ट लक्षात घ्या, मग तुम्हाला त्याचे खरे महत्व समजेल. सविता प्रभावळे यांच्या हस्ते अजय कुरणे यांचे स्वागत करण्यात आले. या नंतरच्या सत्रात विद्यार्थ्यांनी लोक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.
सकाळच्या सत्रात साहित्यिकांचे माहिती प्रदर्शन असलेल्या वाचनकट्ट्याला न्यू हायस्कूलसह विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भेट दिली.
या बाल स्नेहसंमेलनाची सारी सूत्रे विद्यार्थ्यांनीच सांभाळली. स्वागताध्यक्ष घनश्याम शिंदे याने प्रास्ताविक केले. समर्थ याने पाहुण्यांची ओळख करून दिली, तर करिना धनवडे हिने सूत्रसंचालन केले. माधुरी सुतार हिने आभार मानले. यावेळी मुख्याध्यापक पी. डी. काटकर, कलाशिक्षक मिलिंद यादव उपस्थित होते.
लोकनृत्याचा घेतला विद्यार्थ्यांनी आनंद
शाळेतील विद्यार्र्थ्यानी या बालस्नेहसंमेलनाच्या निमित्ताने फनफेअर आणि लोकनृत्याचा आनंद घेतला. अंधश्रध्देवर प्रहार करणाऱ्या विषयाशी संबंधित लोकनृत्याचा आविष्कार आणि ग्रामीण संस्कृतीचा परिचय देणाऱ्या फनफेअरनंतर या संमेलनाचा समारोप झाला.