कोल्हापूर : पार्किंगच्या जागेत दुकानगाळे उभारणाऱ्यांवर कारवाई करा, स्थायी समिती सभेत मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 11:40 AM2018-07-07T11:40:00+5:302018-07-07T11:42:31+5:30
कोल्हापूर शहरात इमारती बांधण्यापूर्वी नकाशावर पार्किंगची जागा राखीव ठेवली जाते; मात्र प्रत्यक्षात नकाशातील या पार्किंगच्या जागेत दुकानगाळे उभारले जातात. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी महानगरपालिका स्थायी समिती सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.
कोल्हापूर : शहरात इमारती बांधण्यापूर्वी नकाशावर पार्किंगची जागा राखीव ठेवली जाते; मात्र प्रत्यक्षात नकाशातील या पार्किंगच्या जागेत दुकानगाळे उभारले जातात. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी महानगरपालिका स्थायी समिती सभेत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते.
शहरातील वाहतुकीच्या अनुषंगाने पार्किंगचा हा विषय प्रतिज्ञा निल्ले यांनी सभेत उपस्थित केला. शहरात बऱ्याच ठिकाणी इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. व्यापारी पेठेत येणारे लोक रस्त्यावरच वाहने लावतात.
याबाबत प्रशासन म्हणून काय कारवाई करणार, अशी विचारणा निल्ले यांनी केली. तर ज्यांनी पार्किंगच्या जागेत दुकानगाळे सुरू केले त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संदीप नेजदार, राहुल माने यांनी केली.
माजी आयुक्त पी. शिवशंकर यांनी बंदिस्त पार्किंगबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पार्किंगची गंभीर समस्या असताता प्रशासनाने काय केले, अशी विचारणाही नेजदार यांनी केली.
शिवशंकर यांनी दिलेल्या आदेशानुसार संबंधितांवर कारवाईच्या नोटीसा दिल्या होत्या. काहींना पार्किंग खुले करण्याचे तसेच दंड भरण्याचे आदेश दिले होते; परंतु बऱ्याच जणांनी दंड भरलेला नाही; म्हणून त्यांच्या घरफाळा बिलात दंडाची रक्कम थकबाकी म्हणून लावा, असे घरफाळा विभागास कळविले असल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला.
देवकर पाणंद येथे एका बिल्डरने एक नैसर्गिक नाला वळविला असून त्याच्यावर फौजदारी दाखल करण्याची मागणी दीपा मगदूम यांनी केली.
नगररचना विभागाने सुनावणी लावली होती, त्याचे काय झाले, अशी विचारणाही मगदूम यांनी केली. त्यावर खुलासा करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, नाल्याची सुनावणी घेण्यात आली; परंतु कागदपत्रावर नाला आढळून आलेला नाही.
शिवाजी मार्केट येथील लिफ्ट एक महिना बंद आहे याकडे कविता माने यांनी लक्ष वेधले. पावसाचे पाणी पडल्याने लिफ्ट बंद पडली आहे. दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून पंधरा दिवसांत ती दुरुस्त होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.