‘एमईएस’ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा गुरुवारपासून, कोल्हापूर शहरातील १६ शाळांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:16 PM2017-12-11T16:16:50+5:302017-12-11T16:19:32+5:30
कोल्हापूर : महावीर एज्युकेशन सोसायटी संचलित महावीर इंग्लिश स्कूल आणि ब्लॉसम प्ले स्कूलच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत ‘एमईएस’ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा गुरुवार (दि. १४) ते रविवार (दि. १७) दरम्यान होणार आहे. यात शहरातील इंग्रजी माध्यमाच्या १६ शाळांचे संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
अध्यक्ष गांधी म्हणाले, कोल्हापुरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल खेळण्याची गोडी निर्माण व्हावी याउद्देशाने ‘एमईएस’ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा होणार आहे. या विजयी संघाला रोख अकरा हजार रुपये, चषक, प्रशस्तीपत्र देवून सन्मानित केले जाईल. विविध गटात सांघिक आणि वैयक्तीक अशी एकूण २७ हजार रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत.
महावीर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री व्हनागडे म्हणाल्या, स्पर्धेत रोज सकाळी आठ ते दुपारी एक यावेळेत चार सामने होतील. सलामीचा सामना महावीर इंग्लिश स्कूल आणि फोर्ट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये होईल.
स्पर्धेचे उदघाटन गुरुवारी सकाळी आठ वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, केएसएचे मानद सचिव माणिक मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अंतिम सामना रविवारी दुपारी बारा वाजता होणार असून यानंतर बक्षीस वितरण मधुरिमाराजे यांच्या हस्ते होईल. पत्रकार परिषदेस स्मिता गायकवाड, रणजित पारेख, केतन आडनाईक, राम यादव उपस्थित होते.
स्पर्धेतील सहभागी संघ
पोदार इंटरनॅशनल स्कूल, दुधगंगा व्हॅली इंग्लिश स्कूल, विमला गोयंका इंग्लिश स्कूल, संजीवन पब्लिक स्कूल (पन्हाळा), लिटल फलॉवर इंग्लिश स्कूल, विबग्योर इंटरनॅशनल, फोर्ट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, महावीर इंग्लिश स्कूल, सेंट झेविअर्स इंग्लिश स्कूल, विजयादेवी यादव इंग्लिश स्कूल, संजीवन प्राईमरी इंग्लिश स्कूल, श्रीमंत माईसाहेब बावडेकर इंग्लिश स्कूल, राधाबाई शिंदे इंग्लिश स्कूल, न्यू इंग्लिश मेडियम स्कूल, छत्रपती शाहू विद्यालय.